Lonavala : गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी पोलिसांचा रुट मार्च

एमपीसी न्यूज- गणेश विसर्जनापूर्वी आज लोणावळ्यात विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांनी रुट मार्च केला.

अनंत चतुर्थी निमित्त आज लोणावळ्यातील मानाच्या 26 गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. गणेश उत्सव लोणावळा शहरात अतिशय शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला आहे. विसर्जन मिरवणूक देखील निर्विघ्नपणे पार पडावी याकरिता लोणावळा शहरात मोठा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. यावर्षी प्रथमच सर्व गणेश मंडळांना कोणत्या चौकात किता वाजता पोहचायचे याचे वेळापत्रक देण्यात आले आहे.

या नियमांचे पालन करण्याच्या सूचना गणेश उत्सव सुरु होण्यापूर्वी पासून सर्व मंडळांना करण्यात आल्या आहेत, दोन दिवसांपूर्वी देखील सर्व मंडळ अध्यक्षांची बैठक घेत सूचनांची उजळणी करण्यात आली आहे. यासर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर आज सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, 50 कर्मचारी, 10 होमगार्ड, 15 वाॅर्डन हे सहभागी झाले होते. सायंकाळ चार वाजता मावळा पुतळा चौकापासून लोणावळ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
विसर्जन मिरवणुक मार्गावर व विसर्जन घाटावर लोणावळा नगरपरिषद, वीज वितरण कंपनी यांनी योग्य नियोजन केले असून गणेश भक्तांच्या मदतीसाठी शिवदुर्गची दोन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. मिरवणूक मार्गावर शिवसेनेच्या वतीने पुलाव भात, रामदेव बाबा भक्त मंडळाच्या वतीने भेळ, लायन्स क्लब व मावळ वार्ता फाऊंडेशनच्या वतीने चहाचे मोफत वाटप ठेवण्यात आले असून शिवाजी महाराज चौकात लोणावळा नगरपरिषद, लोणावळा शहर पोलीस व राजकिय पक्षांच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी लोणावळा नगरपरिषदने कृत्रिम हौद बनविला असून मंडळांनी बाप्पांचे विसर्जन हौदात करावे असे आवाहन नगरपरिषदच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like