Lonavala : पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचले गळफास घेणार्‍या डाॅक्टरचे प्राण

एमपीसी न्यूज- टायगर पाँईट येथील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या करण्याकरिता आलेल्या एका डाॅक्टर युवकाचे प्राण लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्समुळे वाचले. रविवारी (दि. 23) चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायाने डाॅक्टर असलेला एक युवक बीएएमएस असून सध्या एमडीचा अभ्यास करत आहे. अभ्यासक्रम कठीण असल्यामुळे अभ्यासाला कंटाळून लोणावळ्यात आत्महत्या करण्याकरिता तो आला होता.

रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकी गाडीवरुन दोरी घेऊन आलेला एक युवक जंगलात गळफास घेण्याकरिता गेला असल्याची माहिती टायगर पॉईंट येथून एका टपरी चालकांने फोन करून लोणावळा ग्रामीण पोलीसांना दिली. या फोन काॅलचे गांभीर्य ध्यानात घेत लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हनुमंत शिंदे, मयूर आबनावे, स्वप्नील पाटील, पोलीस मित्र शुभम कराळे, योगेश हांडे, गणेश गाडे हे अवघ्या 25 मिनिटात घटनास्थळावर दाखल झाले.

स्थानिक युवक त्या डाॅक्टर युवकाला गळफास घेण्यापासून परावृत्त करत होते. मात्र तो कोणाचे ऐकत नव्हता. पोलीस आल्याचे पाहून त्याने तात्काळ गळ्यात दोर अडकवत फाशी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत झाडाला लटकलेल्या युवकाचे पाय धरत त्याला खाली घेतला. त्याच्या गळ्याला दोरी रुतून जखम झाली होती. त्याला विश्वासात घेत पोलिसांनी आधार देत प्रथमोपचार केले. चौकशीमध्ये तो डाॅक्टर असून अभ्यासाला कंटाळून आत्महत्या करण्याकरिता आला असल्याचे समजले. पूर्वी तो मित्रांसमवेत टायगर पाँईटला येऊन गेला होता. यावरुन त्याने आत्महत्या करण्याकरिता ही जागा निवडली होती. त्याने दिलेल्या माहितीवरुन त्याचे नातेवाईक डॉक्टर यांना संपर्क साधत त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.