Lonavala : मावळात मतदारांचा कल जाणून घेण्याकरिता खासगी संस्थांकडून मतदार कलचाचणी सुरु

एमपीसी न्यूज- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघात कोणता उमेदवार विजयी होईल, कोणता पक्ष सरस ठरेल? या निवडणुकांकडे मावळातील नागरिक कसे पाहतात, त्यांच्या मनातील चेहरा कोणता या सर्व माहितीचा आढावा घेण्याकरीता काही खासगी संस्थाांनी मतदारांची कल चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. ह्या कल चाचणी कोणाकरीता सुरु आहेत. याबाबत मात्र गोपनियता पाळण्यात आली असून मावळ मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये जाऊन नागरिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार यांच्याशी संवाद साधत माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघ असो वा विधानसभा मतदारसंघ दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाची मोठी ताकद असताना देखील केवळ गटबाजी आणि पाडापाडीच्या राजकारणामुळे ह्या दोन्ही जागांवर शिवसेना तसेच भाजपाचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीमधील ही गटबाजी रोखत लोकसभा आणि विधानसभा ह्या दोन्ही जागा काबिज करण्याकरिता मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. तर राष्ट्रवादीला रोखण्याकरिता शिवसेना आणि भाजपने देखील कंबर कसली आहे.

  • मावळात वारंवार पदाधिकार्‍यांना तंबी दिल्यानंतरही गटबाजी संपत नसल्याने राष्ट्रवादीने यावेळी दस्तुरखुद्द अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनाच लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी सुरु केली आहे. याकरीता मतदारसंघात विभागनिहाय संपर्क अभियान, पोस्टरबाजी, कार्यक्रमांना उपस्थिती, स्थानिक पातळीवर बुथ प्रतिनिधी प्रशिक्षण सुरु आहे.

लोकसभेसोबतच विधानसभा देखील काबिज करण्याचा राष्ट्रवादीचा मनसुबा आहे. दुसरीकडे लोकसभेला कोणीही आले तरी विजय आपलाच आहे असे म्हणत खासदार श्रीरंग बारणे यांनी कंबरी कसली आहे. तर विधानसभेत मावळातून हॅट्रिक मारण्यासाठी आमदार बाळा भेगडे कामाला लागले आहेत. मात्र, मावळात यावेळी भाजपामधून विधानसभेकरिता सुनील शेळके आणि रविंद्र भेगडे हे तीव्र इच्छूक असल्याने तिकिटाकरिता मोठी रस्सीखेच मावळ भाजपमध्ये होणार आहेत. तिनही इच्छूक तुल्यबळ आणि विकासकामात अग्रेसर असल्याने मावळात विधानसभेच्या तिकिट वाटपाकरिता व त्यानंतर इतरांची मनधारणा करण्याची मोठी कसरत भाजपा श्रेष्ठींना करावी लागणार आहे.

  • काही इच्छूकांनीच सुरु केलीय ‘खासगी’च्या माध्यमातून कल चाचणी
    सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या कलचाचणीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. मावळ लोकसभा आणि विधानसभेला इच्छूक जास्त असले तर मतदारांच्या मनातील चेहरा कोणता? याचा शोध घेण्याचे काम या कल चाचण्यांमधून सुरु आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ हा पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. एकूण मतदानांपैकी 60 टक्के मतदान मावळ, पिंपरी, चिंचवड भागात असल्याने लोकसभेकरिता पिंपरी चिंचवड भागातील चेहर्‍यालाच उमेदवारी मिळू शकते, मात्र, असा नवखा चेहरा पनवेल, कर्जत, उरण येथील मतदार आत्मसाथ करतील क‍ा? की घाटाच्या खालून सर्वसमावेशक चेहरा देतील. याबाबत चर्चा सुरु आहेत. सध्या सुरु असलेल्या मतदार कल चाचण्या ह्या तिकिट वाटपाकरिता महत्वाच्या ठरणार असल्याने काही इच्छूकांनीच खासगी संस्थाच्या माध्यमातून मतदार कल चाचण्या सुरु केल्या असल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.