Lonavala : ”या’ कंपन्यांवर बंदी येईल का ?’ लोणावळ्याच्या स्थानिक टॅक्सी चालकांचा सवाल

ऑनलाईन प्रवासी वाहतूक करणार्‍या कंपन्यांच्या घुसखोरीने स्थानिक टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ

एमपीसी न्यूज- ओला उबेर या ऑनलाईन प्रवासी वाहतूक करणार्‍या भांडवलदार व्यावसायिकांच्या घुसखोरीमुळे लोणावळा शहर व परिसरातील स्थानिक टुरिस्ट कार व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मागील दीड वर्षापासून स्थानिक व्यावसायिक ओला उबेरच्या विरोधात दाद मागत आहेत मात्र शासकीय पातळीवर सहकार्य मिळत नसल्याने स्थानिक हैराण झाले आहेत.

लोणावळा हे पर्यटनाचे ठिकाण असल्याने स्थानिक युवक रोजीरोटीचा व्यवसाय म्हणून चारचाकी वाहने घेत उदरनिर्वाह करत आहेत. लोणावळा शहर व ग्रामीण भागातील सुमारे पाचशे ते सहाशे युवक या व्यावसायामध्ये आहेत. लोणावळा व मावळ साईटसीन, मुंबई, पुणे ड्राॅप, शिर्डी, कोल्हापुर, महाबळेश्वर या भागात प्रवासी सोडण्याचा व्यवसाय ही मंडळी करतात. लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणात हाॅटेल असल्याने येथे टुरिस्ट व्यवसायाला चांगले दिवस आहेत. असे असले तरी ओला, उबेर, झूम कार यासारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या भांडवलदार कंपन्यांच्या घुसखोरीमुळे येथील व्यवसायाला घरघर लागली आहे. कमीत कमी भाड्यात या कंपन्या ग्राहकांना घेऊन जात असल्याने स्थानिक व्यावसायिकांना हताश होऊन बसण्याची वेळ आली आहे.

स्थानिक व्यावसायिकांनी ओला उबेर सारख्या कंपन्यांच्या विरोधात मागील दीड वर्षापासून संघर्ष सुरु केला आहे. अनेक वेळा वादविवाद, पोलीस तक्रारी, आंदोलने, उपोषणे केली. स्थानिक पोलीस ठाण्यापासून वरिष्ठ पोलीस अधिकारी, आरटीओ अधिकारी, परिवहनमंत्री, मावळचे आमदार, खासदार, माजी राज्यमंत्री यांच्या भेटी घेत स्थानिकांचा प्रश्न मांडला. मात्र अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याने स्थानिकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. ओला उबेर या भांडवलदार कंपन्या ऍपच्या माध्यमातून लोणावळ्यात भाडे घेऊन येतात, तसेच जाताना पुन्हा त्यांना ऍपच्या माध्यमातून भाडे मिळत असल्याने त्यांना कमी दरात वाहन चालविणे परवडते.

स्थानिक व्यावसायिकांना मात्र लोणावळ्यातून मुंबई अथवा पुण्याला भाडे घेऊन गेल्यानंतर पुन्हा येताना भाडे मिळत नसल्याने त्यांना ग्राहकांकडून जादा दर आकारावा लागतो. याच गोष्टीचा फायदा मोठ्या भांडवलदार कंपन्यांनी उचलला आहे. मागील महिन्यात ओला उबेर बंद कराव्यात या मागणीकरिता सर्व व्यावसायिकांनी उपोषण केले होते. त्यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत 26 जानेवारीपासून ओला उबेर लोणावळ्यात बंद होतील असा शब्द दिला होता. मात्र अद्याप ओला उबेर सुरुच असल्याने स्थानिक युवक चिंताग्रस्त झाले आहेत. भांडवलदार कंपन्या पैशाच्या बळावर स्थानिक व्यावसायिकांना त्रास देत असल्याने स्थानिक व्यावसायिकांनी लोणावळा खंडाळा परिसरात ओला उबेर सारख्या भांडवलादार कंपन्यांच्या वाहनांना पूर्णतः बंदी घालावी अशी मागणी केली आहे.

वास्तविक पाहता कोणत्याही पर्यटनस्थळांचे अर्थकारण हे पर्यटकांच्या जीवावर सुरु असते. त्यामध्ये हाॅटेल व्यवसाय, लहान मोठे टपरीधारक, रिक्षा व टँक्सी चालक, चिक्की तसेच इतर अनेक लहान मोठे व्यवसाय हे पर्यटनावर अवलंबून असतात. अनेक स्थानिक नागरिकांना या व्यवसायांमधून रोजगार मिळत असताना काही भांडवलदार कंपन्यांमुळे स्थानिकांवर उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. अशावेळी स्थानिक प्रशासन तसेच आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी यांनी स्थानिक व्यावसायिकांच्या पाठीशी उभे राहून त्यांचा रोजगार वाचविण्याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याच्या भावना स्थानिक व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.