Lonavala: लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात सौर उर्जेचा लख्ख प्रकाश

Lonavala railway station area with solar energy लोणावळा रेल्वे स्थानकावर लाईट सोबत सोलर पॅनल, सौर झाडे, सौर वॉटर कूलर आदी बसविले आहे.

एमपीसी न्यूज- लोणावळा व खंडाळा रेल्वे स्थानकाचा परिसर मध्य रेल्वेच्या वतीने सौर उर्जेने उजाळला आहे. 2030 सालापर्यंत मध्य रेल्वे कार्बनमुक्त करण्याचा संकल्प रेल्वे प्रशासनाने केला आहे. याचा प्रायोगिक प्रकल्प लोणावळा व खंडाळा रेल्वे स्थानक परिसरात पाहायला मिळत आहे. अक्षय उर्जेचा उपयोग करून रेल्वे स्थानकाचा परिसर, शेजारी असलेले गार्डन व पादचारी पुल उजळविण्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील इतर स्थानकांप्रमाणे लोणावळा स्थानकाचा समावेश एलाईट क्लबमध्ये करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने सौर उर्जेचा वापर करून वीज बिलातील बचतीसह ग्लोबल वार्मिंग कमी करण्याच्या दृष्टीकोनातून आणि हवामान बदलाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी अनेक महत्वाचे हरित उपक्रम हाती घेतले आहेत.

लोणावळा रेल्वे स्थानकावर लाईट सोबत सोलर पॅनल, सौर झाडे, सौर वॉटर कूलर आदी बसविले आहे. प्लॅटफार्म क्रमांक दोन व तीनच्या छतावर हे सोलर पॅनल बसविण्यात आले असून त्यामधून 76 किलोवॅट उर्जा याप्रमाणे वर्षाला 68 हजार 400 किलोवॅट उर्जा निर्मिती होणार आहे.

यार्ड परिसरात एक ग्रीन गँग हट बनविले आहे. खंडाळा येथील रेल्वे गेट क्रमांक 30 जवळ देखील सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी लोणावळा स्थानक परिसरात कंपोस्ट प्रकल्प तयार केला आहे.

येथे निर्माण झालेले कंपोस्ट खत स्थानक परिसरातील झाडांकरिता वापरण्यात येणार आहे. रेल्वेच्या या उपक्रमामुळे लोणावळा खंडाळाच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. स्थानकाचा परिसर हरित व स्वच्छ ठेवण्यावर रेल्वे भर देणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.