Lonavala: लोणावळ्यात वादळी वारा, पावसाने पडली शंभराहून अधिक झाडे

Lonavala Rain Updates: More than a hundred trees fell in Lonavala due to strong winds and rains

एमपीसी न्यूज- ‘निसर्ग’ वादळामुळे लोणावळ्यात वादळी वारा व पाऊस सुरू झाल्याने लोणावळा व खंडाळा परिसरात जवळपास 100 हून अधिक ठिकाणी झाडे पडली आहेत. काही ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. लोणावळा मुख्य चौकातील भाजी मंडईचे पत्रे तसेच काही घरांचे व इमारतींवरील मान्सून शेडचे पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोकण किनारपट्टीवर निसर्ग वादळाचा तडाखा बसल्याने त्याचा परिणाम लोणावळा व खंडाळा परिसराला देखील बसला. मंगळवारी सायंकाळपासून लोणावळा परिसरात पावसाची संततधार व वारा सुरू झाल्याने शहरातील बहुतांश भागातील बत्ती गुल झाली होती.

बुधवारी सकाळपासूनच लोणावळ्यात सोसाट्याचा वारा व पाऊस सुरू झाल्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपोलो गॅरेज समोर तसेच तुंगार्ली चौकात, नारायणीधाम शेजारी, रायवुड भागात काही ठिकाणी, सिध्दार्थनगर, हिलटॉप खंडाळा, जुना खंडाळा, तुंगार्ली, भांगरवाडी, वलवण, नांगरगाव, आण्णाभाऊ साठे वसाहत, ठोंबरेवाडी, सिध्दार्थनगर या सर्व परिसरात मिळून शंभराहून अधिक लहान मोठी झाडे पडली.

_MPC_DIR_MPU_II

डिसी शाळेजवळ रस्त्यावर विजेचा खांब पडला. लोणावळा भाजी मार्केटचे तसेच बंगले, सोसायट्या, घरे, रेल्वेचा पादचारी पूल यांचे पत्रे उडाले आहेत.

लोणावळा नगरपरिषदेने तात्काळ आप्तकालिन दहा पथक तयार करत पडलेली झाडे जेसीबी मशिनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम उशिरापर्यंंत सुरू होते.

दुपारनंतर वार्‍यांचा व पावसाचा जोर वाढल्याने भाजी मार्केट व बाजारभाग बंद करण्यात आला. दरम्यान वीज वितरण कार्यालयाकडून खबरदारीचा उपाय म्हणून दिवसभर वीज पुरवठा बंद करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like