Lonavala : विद्यार्थिनींनी बांधल्या पोलीस बांधवांना राख्या

एमपीसी न्यूज- रक्षाबंधनानिमित्त लोणावळ्याच्या व्हिपीएस शाळेच्या विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकी जपत पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात हा रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण भावाकडे जाऊन त्याला राखी बांधून आपले रक्षण करण्यासाठी साकडे घालते. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस बांधवाना या दिवशी देखील आपल्या बहिणीला वेळ देता येत नाही, या करिता व्हीपीएस शाळेच्या मुलींनी पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. शाळेचे मुख्याध्यापक सुधरेंद्र देशपांडे ‍व शिक्षक वर्गाचे याकामी मार्गदर्शन लाभले.

सफाई कामगारांना बांधल्या राख्या

लोणावळा शहरात सफाई दूत म्हणून काम करणारे सफाई कामगार यांना सिंहगड पब्लिक स्कूलच्या मुलींनी राख्या बांधत अनोख्या पध्दतीने रक्षाबंधन साजरे केले. तसेच त्या सर्वांना स्वच्छता दूत असे लिहिलेल्या टोप्या भेट देण्यात आल्या. सिंहगड पब्लिक स्कूलचे मुख्यध्यापक एन.के.मिश्रा, शिक्षिका वंदना तळेकर, छोेटे ठाकूर, आर.गुप्ता यांचे याकामी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

पर्यावरण पूरक राख्या

रक्षाबंधनाच्या निमित्त व्हिपीएस शाळेच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पर्यावरणपुरक राख्या तयार केल्या आहेत. या उपक्रमार्तंगत विद्यार्थ्यांनी घरातील टाकाऊ वस्तू कागदाचे तुकडे, कापसाचे तुकडे, काडीपेटीच्या काड्या, बांगड्यांचे तुकडे आदी टाकाऊ साहित्यापासून या राख्या तयार केल्या असून निसर्गाचे रक्षण करण्याच्या हेतूने झाडांना सदर राख्या बांधण्यात आल्या.

अंध आजोबांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा

श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय मळवलीच्या स्काऊट गाईड पथकाच्या वतीने खंडाळा येथील अंधवृध्दाश्रमात रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. वृध्दाश्रमातील सत्तरहून अधिक अंध आजोबांना राख्या बांधण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी अंध आजोबांना खाऊवाटप केले तसेच पेढा भरवून आजोबांचे तोंड गोड केले.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने खाऊच्या पैशातून जमविलेल्या वर्गणीतून सर्व आजोबांना एक वेळच्या अल्पोपाहाराचा खर्च देखील देण्यात आला. विद्यालयाच्या पालक शिक्षक कार्यकारिणीच्या सहसचिव राजश्री कांबळे व नामदेव कडू यांनी उपक्रमास आर्थिक सहकार्य केले. विद्यालयाचे प्राचार्य कैलास साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट शिक्षक संतोष तळपे यांनी उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अंधवृध्दांश्रमाचे व्यवस्थापक सचिन बर्दापूरकर उपस्थित होते.

युवा सेनेच्या वतीने अनाथाश्रमात रक्षाबंधन

युवा सेनेच्या वतीने भाजे येथील संपर्क बालग्राम अनाथ आश्रमातील मुलींबरोबर रक्षाबंधन साजरे केले. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना मुलींनी राखी बांधली व रक्षाबंधन साजरे केले. यावेळी युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, नितिन देशमुख, अक्षय हुलावळे, गिरीश हुलावळे, आदेश हुलावळे व युवा सेनेचे कार्यकर्ते, संपर्क बालग्रामचे व्यवस्थापक सुभाष बोंगार्डे उपस्थित होते.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.