Lonavala : लोणावळा परिसरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- लोणावळ्यातील श्रीराम मंदिर गवळीवाडा व भांगरवाडीतील श्रीराम मंदिर येथे दुपारी साडेबारा वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला. गवडीवाड्यातील रामनवमी उत्सवाचे हे 85 वे वर्ष होते.

रामजन्मोत्सवानिमित्त गवळीवाड्यात मागील आठवडाभरापासून रामरक्षा पठण व रामनाम जप सुरु होता. पहाटे वेदमूर्ती रघुनाथ काका उर्फ बाळू पंढरपुरे यांच्या शुभहस्ते व प्रभु रामचंद्राच्या पवमान सुक्त मंत्राचे अभिषेक व पूजा करण्यात आली. प्रवचनकार पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी प्रभु रामचंद्रांचे चरित्र कथन केले. पिंगळे गुरुजी यांच्या हस्ते दुपारी श्रीराम नवमी निमित्त अष्टमीचा होम झाला. दुपारी साडेबारा वाजता रामजन्माचा गजर करत आरती व रामजन्माचा पाळणा म्हटला गेला. गवळीवाडा व लोणावळा भागातील महिला यावेळी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

उत्सवानिमित्त श्रीं च्या पालखीची मिरवणूक, कुस्त्यांचा जंगी आखाडा, व्याख्याने, स्थानिक मुलांच्या नृत्यांचे कार्यक्रम, गीत रामायण कार्यक्रम, आँर्केस्ट्रा, महिलांचे खेळ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.