Lonavala : कैलासनगर स्मशानभूमीची तातडीने दुरुस्ती करा – शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज :  कैलासनगर स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पावसाळा तोंडावर असल्याने या स्मशानभूमीच्या शेडचे तुटलेले पत्रे व इतर दुरुस्ती कामे तातडीने करावी, अशी मागणी लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

लोणावळा बाजारपेठ परिसरासह भांगरवाडी विभागाकरिता कैलासनगर ही एकमेव स्मशानभूमी आहे. याबाबत शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक म्हणाले, स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याने अंत्यविधी करिता नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

स्मशानभूमीच्या छताचे पत्रे जागोजागी उडाले आहेत. जमिनीवर खड्डे पडले आहेत. मृतदेह दहनासाठीचे लोखंडी स्टँड तुटल्याने नागरिकांना मृतदेह जमिनीवर ठेवूनच अंत्यविधी उरकावा लागत आहे.

पावसाळा तोंडावर असल्याने पावसाळ्यात नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने तातडीने स्मशानभूमीचे खराब झालेले पत्रे बदलावेत तसेच दुरुस्तीचे काम मार्गी लावावे, अशी मागणी शहरप्रमुख फाटक केली आहे.

मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना शिवसेना शहर समन्वयक जयवंत दळवी, उपशहर प्रमुख मनेष पवार, संजय भोईर, विजय आखाडे, माजी नगरसेवक बाळासाहेब कडू आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.