Lonavala : ग्रामीण पर्यटन विकासाला चालना देण्याकरिता 25 नोव्हेंबरला संपर्क हेरिटेज वाॅक

मावळातील ऐतिहासिक वास्तुंचे होणार जतन

एमपीसी न्यूज- इतिहासाच्या पाऊलखुणांची साक्ष देणारे गड किल्ले व लेण्या या ऐतिहासिक वास्तुंचे जतन करण्यासोबत ग्रामीण पर्यटनाला चालना देण्याकरिता 25 नोव्हेम्बर रोजी संपर्क हेरिटेज वाॅकचे आयोजन करण्यात आले आहे. भाजे लेणी ते लोहगड किल्ला दरम्यान हेरिटेज वाॅक होणार असून हे वाॅकचे तिसरे वर्ष आहे.

संपर्क संस्था मागील अनेक वर्षापासून भाजे गावात अनाथ, निराधार मुलींकरिता अनाथाश्रम चालविते. या वाॅकमधून जमा होणारा निधी या मुलींच्या शिक्षणाकरिता व त्यांच्या संगोपनाकरिता खर्च केला जातो. यावर्षी जमा निधीतील काही रक्कम ही भाजे व लोहगड गावांच्या पर्यटन विकासाकरिता देण्यात येणार असल्याचे बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. निर्सगाच्या सानिध्यात येत्या 25 नोव्हेंबर रोजी हा वाॅक होणार आहे.

या वाॅकमध्ये सहभागी होणार्‍या नागरिकांना वाॅक दरम्यान महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. वासुदेव, गोंधळी, तुळशी वृदांवनाशेजारी फेर धरुन गाणी गाणार्‍या महिला, साधु संत, वारकरी, म‍ावळे, भजनकरी, लाठीकाठी व तलवारबाजी, पोवाडे, मल्लखांब यांचे दर्शन होते. सोबतीला भाजलेले शेंगदाणे, मक्याचे कणीस, वडापाव, समारोपाच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, शिवकालिन शस्त्रांचे प्रदर्शन व मेजवानी करिता भरलेले वांगे, पिठलं भाकरी असा मराठमोळा बेत असतो.

पर्यटनाचे माहेरघर असलेल्या लोणावळा शहर‍च्या आजुबाजुला ग्रामीण भागात इतिहासाची साक्ष देणारे अनेक गड किल्ले व पुरातन लेण्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंची युनेस्को मध्ये नोंद झाल्यास त्यांचे कायमस्वरुपी जतन व संगोपन होईल तसेच ग्रामीण पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल या हेतूने प्रेरित होऊन संपर्क बालग्राम या अनाथ मुलांचे संगोपन करणार्‍या संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांनी 2016 साली संपर्क हेरिटेज वाॅक ही संकल्पना मांडली.

या वाॅकमधून नागरिकांना महाराष्ट्रातील इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवून देण्याचा प्रयत्न केला. भाजे लेणी परिसरात भाजे लेणी, बेडसे लेणी, लोहगड किल्ला, विसापुर किल्ला व जगप्रसिध्द कार्ला लेणी या पाच पुरातन व ऐतिहासिक वास्तु आहेत. याची माहिती जगाला व्हावी तसेच युनेस्कोमध्ये या वास्तुंची नोंद झाल्यास त्यांच्या विकासाकरिता व देखभाल दुरुस्ती करिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल, या वास्तुंचे कायमस्वरुपी जतन केले जाईल ही या मागची भावना असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.