Lonavala: मावळ तहसील कार्यालयातील स्वच्छतेचे वाजले तीन तेरा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यासह देशभरात कोरोना या आजाराने थैमान घातलेले असताना मावळ तहसील कार्यालयाचे स्वच्छतेच्या बाबतीत पूर्णतः दुर्लक्ष झाले असल्याची बाब त्यांच्याच कार्यालय कक्षेतील स्वच्छतागृहांच्या दैनावस्थेवरून अधोरेखित होत आहे.

मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना ही गोष्ट माहीत असताना देखील ते स्वच्छतेकडे दुलर्क्ष करत तहसील कार्यालयात येणार्‍या नागरिकांच्या जिवाशी खेळ करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष व आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पोरवाल यांनी पुणे विभागीय आयुक्त व पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे.

पोरवाल म्हणाले की, देशभरात कोरोना आजाराचा संसर्ग वाढत आहे. पुणे जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमणारे सर्व कार्यक्रम, यात्रा, मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तहसील कार्यालयाला हा आदेश लागू नसल्याने तेथे विविध दाखले घेण्याकरिता नागरिकांची झुंबड आहे. ही गर्दी कमी करण्याऐवजी वेळेवर दाखल्यांवर सह्या न करता नागरिकांना थांबवून ठेवत येथे कृत्रिम गर्दी केली जात आहे. दुसरीकडे नागरिकांच्या सुविधेकरिता असलेल्या स्वच्छतागृहांची दैनावस्था झालेली आहे. नळांना पाणी नसल्याने हात धुता येत नाहीत की स्वच्छतागृहात पाणी टाकता येत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

सदरची  अस्वच्छता ही नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारी असून यामधून कोरोनासह विविध प्रकारचे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. हे सर्व उघडपणे दिसत असताना तहसिलदार स्वच्छतेकडे कानाडोळा करत असल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत सदरचे प्रकार रोखण्याकरिता उपाययोजना कराव्यात अशी मागणी पोरवाल यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.