Lonavala : शिवसेनेतर्फे ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर भाजी विक्री केंद्र; नागरिकांची लूट थांबली

बाजारातील गर्दी टाळण्यासाठी नगरपरिषदेकडून घर पोहोच सेवा

एमपीसी न्यूज : कोरोना संसर्गामुळे लाॅकडाऊन झाल्यापासून खंडाळा, तुंगार्ली, न्यु तुंगार्ली, भुशी रामनगर, जुना खंडाळा, रायवुड, वलवण नांगरगाव या भागात ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर भाजी विक्री केंद्र सुरू झाल्याने भाजीपाला विक्रीतील चढ्या भावाला काहीसा चाप बसला आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी नगरपरिषदेने नागरिकांना घरपोहोच भाजीपाला पोहोचविण्यास सुरुवात केली आहे.

मावळचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांच्या आदेशान्वे व लोणावळा नगरपरिषदेच्या परवानगीने शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांनी हा उपक्रम राबविला आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून हा उपक्रम सुरु आहे. याबाबत कोठेही प्रसिध्दी केली जात नसून नागरिकांना कोरोनाच्या संकटात रास्त भावात भाजी मिळावी हा एकमेव उद्देश ठेवण्यात आला आहे. एकूण पाच केंद्रावर दिवसभरात सरासरी चार ते पाच हजार किलो भाजी विक्री होत असल्याचे खराडे यांनी सांगितले.

दरम्यान, बाजाराभागातील गर्दी कमी करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने भाजीपाला, किराणा व जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता वाॅर्डनिहाय दिलेल्या क्रमांकावर आँर्डर दिल्यास तात्काळ घरपोच माल पोहचविला जाईल, असे नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तूं वगळता अन्य सर्व दुकाने बंद झाल्याने बाजारपेठेत भाजीपाला दुकानांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कोणीही भाजी विक्रीची दुकाने सुरू करत नागरिकांच्या गरजेचा गैरफायदा घेत चढ्या भावाने मालाची विक्री केली जात होती. याकरिता वाॅर्ड निहाय ना नफा ना तोटा तत्वावर सामाजिक अंतर राखत भाजी विक्री केंद्र सुरू करत नागरिकांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले आहे.

या भाजी विक्री केंद्रामूळे खंडाळा, तुंगार्ली, वलवण, नांगरगाव, भूशी, रामनगर, र‍ायवूड भागातून मुख्य बाजारात नागरिकांची गर्दी देखील कमी झाली आहे. आता नगरपरिषदेने घरपोच सेवा सुरू केल्याने नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, विनाकारण, जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली घराबाहेर फिरू नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी केले आहे.

आज पहिल्या दिवशी घरपोच सेवेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला तसेच व्यावसायकांनी देखिल नागरिकांना दुकानावर येण्याऐवजी घरपोच सेवा घ्यावी, असे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.