BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : गावोगावी शिवजयंती उत्सवाचा जल्लोष

INA_BLW_TITLE

एमपीसीन्यूज- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची तिथी प्रमाणे आलेली शिवजयंती आज लोणावळा शहरासह गावोगावी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.

दोन दिवसांपासून गावोगावचे शिवजयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगड, प्रतापगड, लोहगड, विसापुर, तिकोना, राजमाची, तुंग, वित्तडगड, कोराई गड, इंदोरी, राजगड, सज्जनगड, पन्हाळा, चावड अशा विविध गडांवर शिवज्योती आणण्याकरिता गेले होते. आज सकाळपासुनच या शिवज्योतीचे आगमन लोणावळा शहरात झाले.

लोणावळ्यातील मुख्य चौकात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याकरिता शहर व ग्रामीण भागातील सर्व शिवज्योती येत होत्या. भाजी मार्केटच्या मुख्य चौकात दरवर्षीप्रमाणे श्री योध्दा प्रतिष्ठान मित्र मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व शिवज्योतींचे व शिवजयंती मंडळांचे स्वागत करण्य‍ात आले तसेच आलेल्या शिवभक्तांना पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.

शिवसेनेच्या वतीने कुमार चौक ते बाजारपेठ दरम्यान जागोजागी स्वागत कमानी व दोन्ही बाजुला कनाती लावण्य‍ात आल्याने संपुर्ण शहर शिवमय व भगवेमय झाल्याचे चित्र पहायला मिळत होते. तरुणाई हातात भगवे झेंडे व शिवज्योती घेत धावत होते, अतिशय उत्साहपुर्ण वातावरण व जल्लोषात शिवजयंतीचा हा सण साजरा होत होता. निवडणुक आचारसंहितेमुळे शिवजयंती बॅनरमुक्त पहायला मिळाली.

लोणावळा शहरातील तुंगार्ली, भांगरवाडी, नांगरगाव, वलवण, खंडाळा, रामनगर, भुशी, कुसगाव, डोंगरगाव, कुसगाववाडी, ओळकाईवाडी, औंढे, औंढोली, वरसोली, वाकसईचाळ, वाकसई, देवघर, करंडोली, कार्ला, वेहेरगाव, मळवली, शिलाटणे, सदापुर, पाटण, बोरज, प‍ाथरगाव यासह गावोगावी ढोल ताश्यांच्या गजरात शिवप्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली होती.

शिवसेनेच्या वतीने लोणावळा शहरात व खंडाळा शहरात शिवप्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात अाली होती. तुंगार्ली व कुसगाव यांच्या मिरवणुका दरवर्षी प्रमाणे जल्लोशात काढण्यात आल्या होत्या. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील व सर्व कर्मचारीवर्ग चौकात हजर होते. अतिशय जल्लोषात व शांततामय वातावरणात शिवजयंतीचा उत्सव पार पडला.

HB_POST_END_FTR-A4

.