Lonavala : लोणावळ्यात शुक्रवार ठरला ‘ब्लॅक फ्रायडे’; पाच अपघातांमध्ये सहा जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- शुक्रवारचा दिवस लोणावळ्यात ‘काळ’ वार ठरला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसभरात घडलेल्या पाच वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये सहा जणांना आपला जीव गमवावा लागला तर एक जण गंभीर जखमी झाला.

पहिला अपघात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मळवली ते देवले दरम्यान झाला. यामध्ये अज्ञात वाहनाने पादचार्‍याला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मनोहर टिकाराम सिंधनजुडे (वय 43, रा. वर्धा, सध्या राहणार देवले मावळ) असे या व्यक्तीचे नाव आहे. दुसरा अपघात पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वाकसई गावाजवळील गोविंदा हाॅटेलच्या समोर झाला. यामध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील दोन जणांचा ज‍ागीच मृत्यु झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. आनंदकुमार प्रल्हाद बनसोडे (वय 33, रा. औरंगाबाद, दुर्ग छत्तीसगड) व हरी रामनरेश डोहारे (वय 27, रा. अळकोंडा भिंड, मध्यप्रदेश) असे या अपघातात मृत झालेल्या युवकांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

तिसरा अपघात हा बोरज गावाजवळ द्रुतगती मार्गावर झाला. यामध्ये अज्ञात वाहनांची धडक बसल्याने एका 28 वर्षीय युवकाचा डोक्याला गंभीर मार लागून मृत्यू झाला. या युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. चवथी घटना ही पवनानगर येथील इराणी बंगल्याच्या खोलीत घडली. याठिकाणी वेदराम मनोहरलाल गुला (वय 65, रा.आग्रा, उत्तप्रदेश) याचा मृत्यू झाला.

पाचवी घटना कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळोली येथे द्रुतगती मार्गावर घडली. मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरला भरधाव वेगातील कार मागून धडकून हा अपघात झाला. यामध्ये कुणाल मयुरेश्वर राजे (वय 20, महेशनगर, पिंपरी) याचा मृत्यू झाला. कुणाल हा कारमधून (एम एच 14 ई यु 4002) शुक्रवारी मुंबईहुन पुण्याकडे येत असताना पिंपळोली गावच्या हद्दीतील द्रुतगती मार्गावरून चाललेल्या गॅस टँकरला (ए पी 31टी ई 6959) पाठीमागून धडकला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.