Lonavala : खासगी अनुदानित प्राथमिक शाळांचा क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरातील सर्व खासगी अनुदानित प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या पुढाकाराने घेण्यात आलेला दोन दिवसीय क्रीडा महोत्सव नुकताच पुरंदरे शाळा मैदानावर पार पडला.

डॉ बी एन पुरंदरे बहुविध विद्यालय, प्राथमिक विभाग, व्ही पी एस मराठी प्राथमिक विद्यालय, गुरुकुल प्राथमिक विद्यालय, व्ही पी एस इंग्लिश टिचिंग स्कुल या चार शाळांचे विद्यार्थी या क्रीडा महोत्सवात सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय पाॅवरलिफ्टर प्रतिभा वाशिवले यांच्या हस्ते या क्रीडा मोहोत्सवाचे उद्घाटन झाले. क्रीडा ज्योत प्रज्वलन करत प्रत्येक शाळेचे संचलन आणि क्रीडा प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. व्ही पी एस मराठी प्राथमिक शाळेच्या इयत्ता तिसरीच्या मुलांनी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय नेत्रदीपक अशी योगासनांची प्रात्याक्षिके याप्रसंगी सादर केली.

कबड्डी, लंगडी, डॉज बॉल या सांघिक खेळांबरोबरच धावणे, दोरी उड्या, चेंडू फेक, बेडूक उड्या अशा वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन या क्रीडामहोत्सवात करण्यात आले होते. लोणावळा शहरात प्रथमच खासगी अनुदानित प्राथमिक शाळांचा हा आंतरशालेय क्रीडामहोत्सव आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड लागावी, खिलाडू वृत्ती निर्माण व्हावी, खेळाविषयी निष्ठा निर्माण व्हावी, स्पर्धा म्हणजे काय असते हे समजावे या उद्देशाने या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

दोन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवाचा समारोप आंतरराष्ट्रीय खेळाडू अशोक मते आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू केतकी बकोरे, माजी नगरसेविका सौम्या शेट्टी व शिवदुर्ग मित्रचे सचिव सुनिल गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. स्पर्धेकरिता कै उमेशभाई शेट्टी प्रतिष्ठान, शिवदुर्ग मित्र लोणावळा व शिवभक्त विजय तिकोने यांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ बी एन पुरंदरे बहुविध विद्यालय, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आनंद गावडे, व्ही पी एस मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल जाधव, व्ही पी एस इंग्लिश प्रायमरी टिचिंग स्कुलच्या मुख्याध्यापिका आरती कदम आणि गुरुकुल मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रेवती कांबळे यांच्या बरोबरच सर्व शाळांचे शिक्षक यांनी महत्वाची भूमिका बजावली. क्रीडा महोत्सवात पंच म्हणून काशिनाथ बगाड, कैलास वाघमारे, अमोल साबळे, अभंग आगलावे, राहुल लंबाते, कबड्डीपटू पुनिकेत गायकवाड व हर्ष गायकवाड यांनी काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.