Lonavala : नगरपरिषदेकडून सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी

Lonavala: Spraying of Sodium Hypochloride by the Municipal Council

एमपीसी न्यूज  : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरता लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने मुख्य मार्गासह सर्व शहरात सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी सुरू करण्यात आली आहे. गवळीवाडा परिसरातून जाणार्‍या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असणारी सर्व दुकाने व हाॅटेल तसेच रस्त्यावर फवारणी करण्यात आली. त्याचप्रमाणे कुमार चौक ते भांगरवाडी हा मुख्य रस्ता व शहरातील अंतर्गत रस्ते, रस्त्याच्या कडेला असणारी दुकाने व घरे यांच्यावर ही फवारणी सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आज अखेर लोणावळा शहराला यश आले आहे. लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलीस यांनी आजपर्यत शहरवासीयांची घेतलेली काळजी व कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना यामुळेच हे शक्य झाले आहे.
सध्या मात्र प्रवासाचे पास घेऊन शहरात येणार्‍यांची संख्या वाढली आहे. पास घेऊन येणारे अथवा विनापास शहरात येणारे यांची माहिती संकलित करून त्यांना क्वारंटाईन करण्याकरिता यंत्रणेने कंबर कसली आहे. याकरिता खंडाळा व वलवल येथे चेकपोस्ट नाके उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे.
शहरात येणारी वाहने व प्रवासी हे कोठून आले व कोठे थांबणार आहेत. याची माहिती घेत क्वारंटाईन केले जात आहे, असा प्रशासनाचा दावा असला तरी याठिकाणी काहीप्रमाण मनुष्यबळ कमी पडत असल्याने काही वेळेस चेकनाक्यावर वाहन तपासणी केली जात नाही, यामुळे काही नागरिक बिनबोभाट शहरात येत आहेत.
विनापास येणारे बहुतांश मध्यरात्रीनंतर शहरात येण्याचा प्रयत्न करतात, अनेक वेळा लपूनछपून येणार्‍यांची माहिती लपवली जाते, काहीवेळा खोटी माहिती दिली जाते असे प्रकार शहराकरिता घातक असल्याने नागरिकांनी पोलीस यंत्रणा व नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले जात आहे.

दोन्ही प्रशासन समन्वयात शहराला कोरोनामुक्त ठेवण्याकरिता काम करत आहे. नागरिकांनी देखिल शहराला कोरोनामुक्त ठेवण्याकरिता कोरोना योद्ध्यांची भुमिका बजावणे गरजेचे असताना काही नागरिक सोशल मिडियावरून माहितीची कोणतीही खातरजमा न करता केवळ प्रशासनावर टिकाटिपण्णी करत प्रशासनातील कोरोना योद्ध्यांचे मानसिक खच्चीकरण करत आहे.
वास्तविक शहरातील दोन्ही प्रशासन, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व नगरसेवक या सर्वांच्या प्रयत्नातून शहरात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना निरंतर सुरु आहेत. अनेक संघटना नागरिकांना मोफत साहित्य वाटप करत आहेत.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने सर्व नागरिकांना मोफत होमिओपॅथी गोळ्या वाटप मोहिम, राजकीय पक्षांपैकी भाजपकडून मास्क व धान्य वाटप, शिवसेनेकडून जेवण, धान्य, चिक्की वाटप, राष्ट्रवादीकडून सॅनिटायझर वाटप करण्यात आले आहे.
नगरपरिषदेने तिसर्‍यांदा शहरात सोडियम हायपोक्लोराईड फवारणी केली. वैद्यकीय अधिकारी व आशा वर्करच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य चौकशी व आवश्यक भासल्यास तपासणी, फ्लू क्लिनिक, कोव्हिड सेंटर, क्वारंटाईन सेंटर तयार करत नागरिकांची तपासणी केली आहे.
आतापर्यत नऊशेहून अधिका नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. शहरात सध्या सर्वत्र सोडियम हायपोक्लोराईड फवारणी सुरू असून नागरिकांनी याकामी सहकार्य करावे तसेच आपआपल्या भागात योग्य प्रकारे फवारणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.