Lonavala : चुकीचे माणूस निवडून दिल्याने विकास रखडला – सुनेत्रा पवार

लोणावळ्यात महिला बचतगट मेळावा

एमपीसी न्यूज- देशात व राज्यात चुकीची माणसं निवडून दिल्याने विकास रखडला आहे. महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारीचे चटके सर्वसामान्य नागरिकांना बसत असताना त्यावर चकार शब्दही न बोलता भावनिक राजकारण करत नागरिकांची दिशाभूल करणार्‍या सरकारला घरी बसविण्याकरिता महिलांनी पार्थ पवारच्या मागे खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी महिलांना केले. लोणावळा विभागातील महिला बचत गटाचा मेळावा नुकताच येथील संचेती लाॅनमध्ये पार पडला. या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांनी महिल‍ांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी पुणे जिल्हा सहकारी बॅकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, निताताई पाटील, सुचित्रा घाडगे, मंजिरी कदम, हेमलता काळोखे, कुसुम काशिकर, राजश्री राऊत, सुर्वणा राऊत, गंगाताई कोकरे, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, ग्रामीण ब्लाॅकचे अध्यक्ष सुभाष जाधव, लोणावळा शहराध्यक्ष जीवन गायकवाड, माजी अध्यक्ष विजय पाळेकर, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ, काँग्रेसच्या महिलाध्यक्षा पुष्पा भोकसे, मनसेचे महिलाध्यक्षा संगीता गुजर, माजी नगराध्यक्ष अमित गवळी, नगरसेविका आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, दीपाली गवळी, श्वेता वर्तक, अनिता धायगुडे, साहेबराव टकले, सोमनाथ गायकवाड, रवी पोटफोडे, शीलाताई बनकर आदी उपस्थित होते.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, ” महिलांना काय चांगले काय वाईट याची चांगली जाण असते. त्यामुळे महिलांनी पार्थच्या मागे खंबीरपणे उभे राहावे. सध्या महागाई वाढली आहे, महिलांची सुरक्षितता, त्यांचे विषय प्रलंबित आहेत, बेरोजगारी वाढली आहे, लोकांच्या हाताला काम राहिले नाही चुकीची माणसे निवडली गेली त्यामुळे विकास रखडलाय असे सांगत आपण निवडून दिलेल्या आमदार, खासदारांनी काय केले याचा जाब विचारण्याची आज गरज आहे. सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या सत्ताधार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळेच ते विकासावर न बोलता पवार कुटुंबियांवर आरोप करत आहेत. मते मागण्यासाठी येणाऱ्या आमदार, खासदाराला मागील काळात दिलेल्या आश्वासनांचा जाब विचारा, बचतगटांची चळवळ जुनी आहे, तळागाळातील महिलांसाठी आधार आहे असे सांगत शरद पवार साहेबांमुळेच महिलांना आदर, सन्मान त्यांचे हक्क, अधिकार मिळाले आहेत. आमदार, खासदार, केंद्रात, राज्यात सत्ता युतीची असूनही महिलांपर्यंत योजना पोचत नाहीत. महिला वंचित राहत आहेत. बचतगटाच्या महिलांनो जो काही उद्योग कराल त्याला त्याच ठिकाणी बाजारपेठ मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ” सुनेत्रा पवार यांनी म‍ावळच्या सर्वांगीण विकासाकरिता पार्थ पवारला तुमचा मुलगा, भाऊ समजुन साथ द्या असे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.