Lonavala: 11 हजार 544 घरांना भेटी; 50 हायरिस्क रुग्णांची तपासणी

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपरिषदेने कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर शहरात त्रिस्तरीय पध्दतीने नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. 17 आशा वर्कर व पाच एनएम कर्मचारी यांच्या माध्यमातून 11 हजार 544 घरांना भेटी देत नगरपरिषदने नागरिकांच्या आरोग्याची वर्गवारी तयार केली आहे.  त्यानंतर वैद्यकीय अधिकारी व फाॅलोअप अशा त्रिस्तरीय पद्धतीने हायरिस्क रुग्णांची वाॅर्डनिहाय तपासणी सुरू झाली आहे. आज अखेर घरभेटीद्वारे अतिजोखमीच्या 50 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

मुख्याधिकारी सचिन पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक राजु बच्चे, वैद्यकीय अधिकारी आर. बी. जगताप हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले शहरात दोन व्यक्ती संशयित सापडल्या होत्या, सुदैवाने त्या दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी एकाला घरी सोडण्यात आले असून दुसरी व्यक्ती वायसीएम मध्ये आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मार्फत तपासणी करण्यात आलेल्या हायरिस्क रुग्णांचा फाॅलोअप घेण्याची जबाबदारी एनआरएचएम मधील नियुक्त परिचारीकांमार्फत सुरू आहे. तर आशा वर्कर मार्फत दुसर्‍या टप्प्यातील सर्वेक्षणाची दुसरी फेरी सुरू झाली आहे.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यात लोणावळा नगरपरिषदेला आज अखेर यश आले आहे. शहरात लाॅकडाऊनच्या पुढील काळात देखिल हे वातावरण कायम ठेवणे गरजेचे असल्याने शहरात अधिक कडक उपाययोजना करत बाहेरून कोणी शहरात येणार नाही याकरिता शहरात येणारे सर्व रस्ते बंद केले जाणार आहेत. सर्वत्र चेकपोस्ट लावत प्रत्येक वाहन व व्यक्ती यांची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. भाजीपाला किराणा यांची सर्व वाॅर्डात सोय करण्यात आली असल्याने कोणीही बाजारात येण्याचा प्रयत्न करू नये अथवा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

शहरात संक्रमण शिबिराच्या माध्यमातून पंडित नेहरु शाळेत 61 व संत ज्ञानेश्वर शाळेत 38 नागरिकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. परदेशी प्रवास करून शहरात 37 नागरिक आले होते तर राज्याच्या विविध भागातून आलेल्यांची संख्या 558 आहे. यासर्वांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. वरीलपैकी 48 जण पुन्हा निघून गेले असून 64 जणांना अँक्टिव्ह (1 ते 14 दिवस) व 446 जणांना पॅसिव्ह (15 ते 28 दिवस) क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती लोणावळा नगरपरिषदेने पत्रकार परिषदेत दिली.

विलगीकरणासाठी 212 बेडची व्यवस्था 

लोणावळा नगरपरिषदेने कोरोना संशयित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याकरिता 212 बेडसची व्यवस्था केली आहे. याकरिता स्टेट बँक आँफ इंडिया रेस्ट हाऊस रायवुड (21 बेड), डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा (20 बेड), कोहिनूर स्कूल खंडाळा (100 बेड), झालावाडी (33 बेड) व जैन वाघाड सॅनेटोरियम न्यू तुंगार्ली (38 बेड) अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

फ्लू क्लिनिकमध्ये 464 जणांची तपासणी

लोणावळा नगरपरिषद हद्दीत सोमवार व मंगळवार दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. या दोन दिवसात शहरातील भाजीपाला व किराणा व्यावसायिक, नगरपरिषद कर्मचारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार, नागरिक अशा 464 जणांची तपासणी करण्यात आली. उद्या सकाळी आशा वर्कर व वरीलपैकी जे कोणी राहिले असतील त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

कोरोनाशी दोन हात करायला यंत्रणा सज्ज

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी लोणावळा नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे. नगरपरिषदेने 20  पीपीई किट घेतले असून 500 मास्क, 100 लिटर सॅनिटायझर, 500 ग्लोज, 700 लिटर सोडियम ह‍ायपोक्लोराईंड, दिडशे लिटर फिनेल, 100 गनबुट, प्रत्येक मजल्यावर हॅन्ड वाॅश व सॅनिटायझर, शहरात पाच ठिकाणी हॅन्ड वाॅश कक्ष, बाजारपेठत जंतूनाशक फवारणी कक्ष, टेम्प्रेचर गण मशिन अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

तीन हजार नागरिकांना घरपोच जेवण

विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून लोणावळा शहरातील 3 हजार गरजू- गरीब नागरिकांना दोन वेळचे जेवण घरपोच दिले जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कोरडा शिधा व भाजीपाला देखील मोफत देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.