Lonavala : टँकर अपघातात राजमाची गावावर शोककळा; एकाच कुटुंबातील तिघांचा नाहक मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर इथेनॉल घेऊन (Lonavala) जाणाऱ्या टँकरला अपघात झाला आणि टँकर पेटला. टँकरमधील इथेनॉल सांडून मोठी आग लागली. या आगीत लोणावळा शहराजवळील राजमाजी या आदिवासी खेड्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. यामुळे राजमाची गावावर शोककळा पसरली आहे.

सविता कैलास वरे (वय 34), कुशल कैलास वरे (वय 8) या मायलेकरांचा तर सविता वरे यांचा भाचा रितेश महादू कोशिरे (वय 18) या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह जनार्दन बापूराव जाधव (वय 60, रा. घाटकोपर, मुंबई), गणेश एकनाथ कोळसकर (वय 39, रा. अंधेरी, मुंबई) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. नितीन सुखदेव सत्रे (वय 32, रा. मोगराळे, ता. मान, जि. सातारा), चंद्रकांत आप्पा गुरव (वय 49, रा. धनकवडी, पुणे), गणेश एकनाथ कोळसकर (वय 39, रा. अंधेरी, मुंबई) हे जखमी झाले आहेत.

सविता वरे त्यांच्या मुलाला आणि भाच्याला घेऊन लोणावळा येथून राजमाचीच्या दिशेने दुचाकीवरून जात होत्या. कुणेगाव येथे पुलाखाली आल्या असता त्यांच्या अंगावर पुलावर पेटलेल्या टँकरमधील इथेनॉल सांडले. त्यामुळे तिघेही गंभीररीत्या भाजले गेले. त्यात कुशल वरे आणि रितेश कोशिरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सविता यांना पुण्यातील ससून रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राजमाची गावावर शोककळा पसरली आहे.

टँकरचा नंबर मिळाला

मंगळवारी (दि. 13) सकाळी 11.30 वाजता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर इथेनॉल (Lonavala) वाहतूक करणाऱ्या एका टॅंकरला अपघात झाला. मंगळवारी उशीरापर्यंत स्थानिक मृत आणि जखमींची नाव वगळता या अपघातग्रस्त टॅंकर विषयी तसेच त्यात प्रवास करणाऱ्या मृत आणि जखमी व्यक्तींविषयी पोलिसांना रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. पोलिसांनी द्रुतगती मार्गावरील टोल नाक्‍याचे सीसीटीव्ही तपासले असता त्यात एमएच 42/बीएफ 9979 या टॅंकरचा नंबर मिळाला.

नितीन सुखदेव सत्रे असे टॅंकर चालकाचे नाव असून तो गंभीर जखमी आहे. टॅंकरमधील दुसरा प्रवासी चंद्रकांत आप्पा गुरव आणि पुलाखाली उभ्या असलेल्या इनोव्हाचा चालक गणेश एकनाथ कोळसकर हे दोघेजण देखील गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी इनोव्हा चालक गणेश कोळसकर याचा बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच जनार्दन बापूराव जाधव (वय 60, रा. घाटकोपर, मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सात वाहने जळाली

टॅंकरला लागलेल्या भीषण आगीमध्ये टँकर जळून खाक झाला. टँकरमधील इथेनॉल सांडून लागलेल्या आगीचे लोट पुलाखाली सांडले. दरम्यान पुलाखाली दोन दुचाकी, एक टेम्पो आणि एक इनोव्हा कार अशी सात वाहने जळाली आहेत. पुलाखाली असलेली टपरी देखील जळाली.

टँकर उचलण्यासाठी गेलेला हायड्रा पेटला

अपघातग्रस्त टँकर द्रुतगती मार्गावर पलटी झाला. आग आटोक्यात आल्यानंतर टँकर उचलून (Lonavala) बाजूला करण्यासाठी हायड्रा (क्रेन) बोलावण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला घेत असताना टँकरमधील इथेनॉल पुन्हा सांडले आणि अचानक आग लागली. दरम्यान क्रेन चालक प्रसंगावधान राखून पळून गेला. मात्र यात क्रेन जळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग पाण्याने देखील विझली नाही.

खासदारांनी केली पाहणी

अपघात झाल्यानंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाची आणि द्रुतगती मार्गाची पाहणी केली. द्रुतगती मार्गावर ठिकठिकाणी आवश्यक त्या सूचना लावाव्यात. खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच या घटनेबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले.

पुलाची तपासणी गरजेची

ज्या उड्डाणपुलावर हा अपघात झाला तो सुरु करण्यापूर्वी तपासणी करणे गरजेचे होते. मात्र द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता वाहतूक सुरु करण्यात आली. इथेनॉल सांडून आग लागली होती. ही आग काही तास चालली. त्यामुळे पुलाला काही धोका निर्माण होऊ शकतो का, याची तपासणी करणे गरजचे असल्याचे आयआरबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.