Lonavala : शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शालेय वह्या पुस्तकांची अनोखी भेट

एमपीसी न्यूज- गुरु शिष्य परंपरेचा अलौकिक मिलाफ असलेल्या शिक्षक दिनाचे औचित्य साधत लोणावळा कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांकडून गरजवंत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तके व वह्या देऊन अनोखा उपक्रम राबविण्यात आला. परिसरात सर्वत्र या वेगळ्या उपक्रमाची चर्चा आहे.

गुरु शिष्य परंपरेत शिक्षक दिनी शिष्य आपल्या गुरुजनांना काहीतरी भेट वस्तु देत गुरुचे आभार मानतो, येथे मात्र माझा विद्यार्थी चांगला घडावा, केवळ परिस्थितीमुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येऊ नये या उदात्त भावनेतून कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी रक्कम जमा करत वह्या पुस्तकांचे वाटप केले. यापूर्वी याच शिक्षकांनी दुर्गम भागातील विद्यार्थी ज्याठिकाणी विजेची सोय नाही अशा मुलांना लाईटचे दिवे भेट दिले होते. आदिवासी वस्ती व ग्रामीण भागातील ज्या मुलामुलींना शिकण्याची आवड आहे मात्र फीचे पैसे भरण्याची ताकद नसल्याने महाविद्यालयात प्रवेश घेता येत नाही अशा विद्यार्थीची फी देखील सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सर्व कनिष्ठ विभागातील शिक्षक पैसा गोळा करुन भरत आहे. शिक्षकांच्या या सामाजिक भावनेचे संस्थेचे संचालक व नागरिक कौतुक करत आहेत.

वह्या पुस्तके वाटपाचा कार्यक्रम लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संस्थेचे सचिव दत्तात्रय पाळेकर, प्राचार्य बी.एन.पवार, उपप्राचार्य जे.ओ.बच्छाव, व्ही.ए.पाटील, कनिष्ठ विभागप्रमुख सविता पाटोळे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुस्तक वाटपाचा उपक्रम कायमस्वरुपी राबवत त्यामधून पुस्तक पेढी तयार करण्याचा शिक्षकांचा मानस आहे. फीच्या शुल्कामध्ये पुस्तके असा हा भविष्यातील उपक्रम असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like