Lonavala : वृद्ध महिलेचा खून करून जबरी चोरी करणा-या दोघांना राजस्थानमधून अटक

एमपीसी न्यूज – दुकानात काम करणा-या कामगाराने त्याच्या मित्राला सोबत घेऊन मालकाच्या घरात चोरीचा प्लॅन केला. हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी अडसर ठरणा-या वृद्ध मालकिणीचा गळा दाबून खून केला. घरातून सुमारे २ लाख ८२ हजार रुपयांची रोकड घेऊन आरोपींनी तात्काळ राजस्थान गाठले. राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील मेडा उपरला येथे एका उंच डोंगरावर असलेल्या महादेव मंदिरातून दोन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

अशोककुमार दलराम सरगरा (वय २०), जगदीशकुमार नेमाराम जोदाजी (वय २२, दोघे रा. मेडाउपरला, ता. जि. जालोर, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांसह पिंटू तारारामजी सरगरा प्रमाण (वय १९) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. रेशम पुरूषोत्तम बन्सल (वय ७०) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

मयत रेशम बन्सल आणि त्यांचे पती पुरुषोत्तम बन्सल कैलासनगर रोड, लोणावळा येथील द्वारकामाई हाउसिंग सोसायटी मध्ये राहतात. त्यांना दोन मुले असून ते दोघेही नोकरीनिमित्त पुण्यात आपल्या कुटुंबासह राहत आहेत. बन्सल दाम्पत्यांना पाच मुली असून त्यांचीही लग्न झालेली आहेत. त्यामुळे लोणावळा येथील अलिशान घरात रेशम आणि पुरुषोत्तम हे दोघेच राहत होते.

पुरुषोत्तम बन्सल यांचे टेबल लँड परिसरांमध्ये ‘पी आर बन्सल’ या नावाचे किराणा दुकान आहे. वयोमानानुसार दुकान सांभाळता येत नसल्याने नोकरांच्या सहाय्याने ते दुकान चालवत आहेत. दोन जानेवारी रोजी सकाळी सात वाजता पुरुषोत्तम बन्सल नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात गेले. सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी दुकानातील नोकराला सांगून घरून नाश्ता मागवला. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास जेवणाचा डबा आणण्यासाठी दुकानातील एका नोकराला पाठवले. नोकराने घरी जाऊन घराची बेल वाजवली असतात आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. बराच वेळ बेल वाजवल्यानंतर कंटाळलेल्या नोकराने पुन्हा किराणा दुकान गाठले आणि हा प्रकार पुरुषोत्तम यांच्या कानावर घातला.

दरम्यान, पुरुषोत्तम यांचे जावई महेश गजानंद अगरवाल हे त्यांना भेटण्यासाठी दुकानात आले होते. रेशम दरवाजा उघडत नसल्याने पुरुषोत्तम यांनी त्यांचे जावई महेश यांना घराच्या मागील बाजूला असलेल्या दरवाजातून जाऊन बघण्यास सांगितले. महेश यांनी पुन्हा घरी जाऊन बेल वाजवून बघितली. मात्र, आतून काहीही प्रतिसाद न आल्याने महेश यांनी घराच्या मागील बाजूला असलेल्या काचेच्या दरवाज्यातून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील स्टोअररूम समोर रेशम पडलेल्या दिसल्या. रेशम यांची काहीही हालचाल होत नसल्याने महेश यांनी त्यांच्या तोंडावर पाणी मारून उठवण्याचा प्रयत्न केला.

रेशम उठत नसल्याने महेश आणि दुकानातील नोकर अर्जनसिंग यांनी रेशम यांना लोणावळा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नातेवाइकांनी रेशम यांचे प्रेत अंत्यविधीसाठी घरी आणले. त्यावेळी महेश यांना घरातील स्टोअर रूममध्ये ठेवलेले लोखंडी कपाट उचकटलेले दिसले. त्यामुळे घरात चोरी झाली असून चोरट्यांनी रेशम यांचा खून केल्याचा संशय महेश यांना आला. त्यांनी तात्काळ लोणावळा शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रेशम यांच्या मृतदेहाची पाहणी केली असता त्यांच्या गळ्यावर लाल रंगाचे डाग दिसून आले.

घरातील लोखंडी कपाटातून रोख रक्कम आणि देवतांच्या चांदीच्या मूर्ती असा एकूण दोन लाख 82 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे उघड झाले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बी आर पाटील, पोलीस कर्मचारी जयराज पाटणकर, वैभव सुरवसे, अमोल कसबेकर, पवन कराड, अजिज मेस्त्री, मनोज मोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस कर्मचारी पी एस वाघमारे, सचिन गायकवाड यांनी तपासाला सुरुवात केली.

पोलिसांनी पुरुषोत्तम बन्सल यांच्या दुकानामध्ये मागील काळामध्ये काम करणाऱ्या नोकरांची माहिती काढली. त्यांच्याच दुकानात काम करणाऱ्या एका नोकराने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून हा प्रकार केल्याचे पोलिसांनी केवळ आठ तासांमध्ये निष्पन्न केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक राजस्थानला रवाना झाले. पोलीस निरीक्षक बी आर पाटील, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने राजस्थान येथील जालोर जिल्ह्यातील मेडा उपरला या ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या हालचाली टिपल्या.

राजस्थान मधील जालोर जिल्ह्यातील एसराणा डोंगरावरील सांगावेरी महादेव मंदिर परिसरात आरोपी लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सलग दहा तास पायपीट करून डोंगर पालथा घातला आणि डोंगरावर असलेल्या महादेव मंदिरातून आरोपी अशोक कुमार जगदीश कुमार आणि त्यांच्या सोबत असलेला पिंटू त्या तिघांना ताब्यात घेतले. आरोपी अशोक कुमार आणि जगदीश कुमार यांच्याकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 83 हजार 710 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

लोणावळा येथे आणून आरोपींकडे चौकशी केली असता माहिती मिळाली की, आरोपी अशोक कुमार हा पूर्वी पुरुषोत्तम बन्सल यांच्या दुकानामध्ये नोकर म्हणून काम करत होता. बन्सल यांच्या तोंडातून अनेक वेळेला मोठी रक्कम घरी असल्याचा उल्लेख ऐकला होता. त्यावरून त्याने बन्सल यांच्या घरामध्ये चोरी करण्याचे ठरविले होते. आरोपी अशोक कुमार याने बन्सल यांच्या दुकानांमध्ये सहा महिने काम केले. त्यानंतर त्याने बन्सल यांच्या दुकानातील काम सोडून लोणावळा येथील मिलन स्वीट होम येथे आचारी म्हणून नोकरी सुरू केली.

दरम्यान, बन्सल यांच्या दुकानात काम करत असताना डबा आणण्याच्या निमित्ताने आरोपी अशोक कुमार वेळोवेळी बन्सल यांच्या घरी जात असे. त्यावेळी त्याने घरातील कपाट कोठे आहे? रक्कम कोठे ठेवली जाते? घरामध्ये जाण्यासाठी दरवाजे कोठे आहेत? घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत का? याबाबतची संपूर्ण माहिती करून घेतली होती. त्यानंतर त्याने बन्सल यांच्याकडील काम सोडले होते. त्यानंतर त्याने बन्सल यांच्याकडील काम सोडले आणि एका स्वीट होम दुकानात काम सुरू केले.

दोन जानेवारी रोजी आरोपी अशोक कुमार त्याच्या साथीदाराला घेऊन बन्सल यांच्या घरात गेला. मयत रेशम आरोपीला ओळखत होत्या. माझ्याकडे अर्धा गॅस सिलेंडर आहे, तुम्हाला हवा आहे का? असा बहाणा करून त्याने घरात प्रवेश केला. घरात जबरी चोरी करण्यासाठी त्याने रेशम यांचा गळा दाबून खून केला आणि कपाट उघडून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. पोलिसांनी या प्रकरणाचा दोन दिवसात तपास करत राजस्थानमधून आरोपींना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.