Lonavala News : पवनानगर मधून चोरलेली जीप दौंडमधून हस्तगत

अवघ्या काही तासात पोलिसांनी ठोकल्या चोरट्याला बेड्या

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पवनानगर येथून बोलेरो जीप चोरून पुणे-सोलापूर महामार्गावरून पोबारा करणा-या चोरट्याला पुणे जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली. आरोपीला बेड्या ठोकून जीप हस्तगत करण्यात आली आहे.

विजय रमेश सोनकांबळे (वय 20, रा. पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे. मूळ रा. जयभिमनगर, नांदेड, जि. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मंगेश रामचंद्र कालेकर यांनी याबाबत लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालेकर यांच्याकडे बोलेरो जीप (एम एच 14 / सी सी 7947) आहे. त्यावर आरोपी विजय हा चालक म्हणून काम करत होता. विजय याने मंगळवारी (दि. 27) दुपारी दीड वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील पवनानगर येथून कालेकर यांची जीप चोरली. दिवसभर जीपचा शोध घेतल्यानंतर कालेकर सायंकाळी सहा वाजता लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले.

त्यावेळी तक्रार देत असताना त्यांनी त्यांचा चालक विजय यानेच जीप चोरून नेल्याचा संशय असल्याचे पोलिसांना सांगितले. जीपचे वर्णन पोलिसांना दिले. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असतानाच पोलिसांनी जीपचा शोध सुरु केला. एलसीबी प्रमुख पद्माकर घनवट यांनी चोरीला गेलेल्या जीपची माहिती एलसीबीच्या सर्व पोलिसांना दिली.

पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांना कालेकर यांची जीप पुणे-सोलापूर महामार्गावरून जाताना दिसली. त्यावरून पोलिसांनी महामार्गावर पेट्रोलिंग करणा-या एलसीबीच्या पोलिसांना माहिती देऊन पाटस येथून आरोपीसह जीप ताब्यात घेतली. आरोपीला पुढील कारवाईसाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, गुरु जाधव यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.