Lonavala : निसर्ग वादळात राजमाची व उधेवाडी गावातील आदिवासींची 36 घरे उडाली

The Nisarga storm destroyed 36 houses of tribals in Rajmachi and Udhewadi villages

एमपीसीन्यूज : निसर्ग चक्रीवादळाने मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डोंगर पायथ्याला असलेल्या राजमाची गावातील 20 घरांचे पत्रे उडाले असून उधेवाडी येथिल वन्हाटी याठिकाणी आदिवासी समाजातील 16 घरे उडून गेली.  मावळ तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये हीच स्थिती असून मावळ तहसिल व गट विकास अधिकारी यांनी महसुली यंत्रणेकडून नुकसानीचा पंचनामा सुरु केला आहे.

लोणावळा शहरात मागील 24 तासात 75 मिमी पाऊस झाला. बुधवारी झालेल्या जोरदार पाऊस व वार्‍यामुळे लोणावळा उपविभागात विजेचे तब्बल 140 खांब पडले असून 45 खांब वाकले आहेत. वादळाने मोठ्या संख्येने झाडे उन्मळून विजेच्या तारांवर पडल्याने लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील विज पुरवठा बुधवारपासून खंडित झाला आहे.

विजेच्या तारा दुरुस्त करत काही भागात वीज पुरवठा सुरळितपणे सुरु करण्याचा महावितरण कार्यालयाकडून अटोकाट प्रयत्न सुरु आहे. निसर्ग वादळाने महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या वादळात ग्रामीण भागात घरांचे पत्रे, जनावरांचे गोठे, पाॅलीहाऊसचे शेड, छप्परे आदींचे शेकडोंच्या संख्येने नुकसान झाले आहे. आज, गुरुवारी सकाळी देखिल लोणावळ्यात जोरदार पाऊस झाला. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली आहे. वार्‍याचा वेग देखिल मंदावला असून नागरिकांनी घरांची दुरुस्ती कामे सुरु केली आहेत.

पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यास नागरिकांच्या घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. लोणावळा नगरपरिषद हद्दीत सार्वजनिक ठिकाणी तब्बल 83 झाडे पडली आहेत तर खाजगी बागा व बंगल्यांच्या परिसरात पडलेल्या झाडांचा अकडा देखिल मोठा असून या सर्व घटनांचा पंचनामा सध्या सुरु आहे.

वादळाने रामनगर व हनुमान टेकडी येथिल अंगणवाड्यांचे पत्रे उडाले आहेत. कुनेनामा येथिल डेल्ला अँडव्हेंचर क्लबच्या काचा वार्‍याने फुटल्या असून जवळपास चाळीस तंबू उडून गेले आहेत. कार्ला एमटीडीसीच्या सात खोल्यांवर झाडे पडली आहेत.

खंडाळा पोलीस चौकीचे पत्रे उडाले आहेत. कुसगाव येथिल सिंहगड महाविद्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. इमारतींचे शेड व सोलर पॅनल उडून गेले आहे. मोठ्या संख्येने झाडे उन्मळून इमारतींवर तसेच रस्त्यावर पडली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.