Lonavala : ‘बिग बाॅस’ हाऊस बंद झाल्याने लोणावळ्याच्या अर्थकारणावर परिणाम

एमपीसी न्यूज – ‘रिअँलिटी शो’मध्ये लोकप्रिय झालेला बिग बाॅस हा शो मागील बारा वर्ष ज्या लोणावळा शहरात झाला ते बिग बाॅस हाऊस आता बंद झाल्याने त्याचा विपरित परिणाम लोणावळ्याच्या अर्थकारणावर झाला आहे.

2006 साली लोणावळा बाजारपेठेतील ऄबीसी बेअरिंग कंपनीच्या आवारात ‘बिग बाॅस’ या रिअँलिटी शो ला सुरुवात झाली. सुरुवातीपासून वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त राहिल्याने सतत प्रसिध्दी झोतात राहिलेल्या ‘बिग बाॅस’ या मालिकेमुळे लोणावळा शहराची दूरवर ओळख निर्माण झाली होती.

  • देश विदेशातील मान्यवर व सेलिब्रेटी या शो’च्या निमित्त लोणावळ्यात येत होते. ‘बिग बाॅस’ या शो च्या हाऊस परिसरात लहान मोठ्या पदावरील जवळपास आठशे ते हजार जण काम करत होते. यापैकी दोनशेच्या जवळपास स्थानिक लोक होते.

उर्वरित लोकांना राहण्याकरिता शहरातील हाॅटेल, लाॅजेस, खाजगी बंगले भाड्याने घेण्यात आले होते. यासह भाजीपाला, किराणा, लाॅन्ड्री या माध्यमातून लोणावळ्यात आर्थिक उलाढाल होत होती. गत बारा वर्ष लोणावळा शहरात सुरु असलेला हा रिअँलिटी शो व ‘बिग बाॅस’ हाऊस हे आता मात्र, स्थानिक राजकारण तसेच वेळोवेळी विविध घटनांमुळे ‘बिग बाॅस’च्या विरोधात झालेली आंदोलने यामुळे गोरेगाव मुंबई येथे हालविण्यात आले आहे.

  • याकरिता येथिल बिग बाॅस हाऊसचा पुर्ण सेटअप हालविण्यात आला आहे. बिग बाॅस हाऊस बंद झाल्याने याठिकाणी काम करणार्‍या स्थानिकांच्या रोजगारावर गदा आली असून हाॅटेल, बंगले, भाजी विक्रेते, किराणामाल विक्रेते याच्या व्यावसायावर देखिल परिणाम झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.