Lonavala : शुभदा कंपनीमधील काॅपर जाॅब चोरणारे चोरटे 24 तासात जेरबंद

लोणावळा शहरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – लोणावळ्यातील नांगरगाव औद्योगिक वसाहतीमधील शुभदा कंपनीमध्ये रविवारी मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत काॅपरचे जाॅब चोरणारे चोरटे लोणावळा शहरच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने 24 तासाच्या आत जेरबंद केले. मागील आठवड्यात शहर पोलिसांनी चार घटना उघडकीस आणल्याने सर्वत्र पोलीस कारवाईचे कौतुक होत आहे. शुभदा कंपनीचे वरिष्ठ एचआर प्रमुख दीपक महादेव पानसरे (वय 27,रा. वलवण लोणावळा) यांनी याप्रकरणी चोरीची फिर्याद दिली होती.

याप्रकरणी सुनील कचरु मुळूक (वय 25, रा. केवरे वसाहत लोणावळा. मूळचा राहणार पेठ, आंबेगाव तालुका), स्वप्निल धनराज मेश्राम (वय 19), प्रशांत राजेश मेश्राम (वय 18), प्रविण राजेश मेश्राम (वय 23 रा. डोंगरगाव लोणावळा. मूळचे राहणार रामटेक, नागपुर) यांना अटक करण्यात आली आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरटे हे पुर्वी शुभदा कंपनीत कामाला होते. त्यामुळे त्यांना कंपनीची आणि परिसराची माहिती होती. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत त्यांनी कंपनीत प्रवेश करत सुमारे 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे काॅपरचे साडेतीनशे ते चारशे किलोचे जाॅब चोरुन नेले.

  • याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर कंपनीमधील सिसीटिव्ही कॅमेरे तसेच गुप्त माहिती व पोलीस मित्रांच्या सहाय्याने पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सामिल प्रकाश, पोलीस नाईक वैभव सुरवसे, श्रीशैल कंटोळी, मनोज मोरे, राजेंद्र मदने, कुणाल आंग्रे, माणिक आयनवे, जयराज देवकर, प्रशांत खुटेमाटे यांच्या पथकाने चोरट्यांचा मागोवा घेत त्यांना त्यांच्या राहत्या घरातून मुद्देमालासह त‍ाब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून 40 हजार रुपये किंमतीचे काॅपर राॅड व गुन्ह्यात वापरलेली वॅगनर गाडी असा 1 लाख 40 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.