Lonavala : आयएनएस शिवाजी प्रशिक्षण केंद्रात नव्याने तीन प्रशिक्षणार्थी ‘कोरोना पॉझिटिव्ह’

Three new trainees 'corona positive' at INS Shivaji Training Center आयएनएस शिवाजीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लोणावळा व कुरवंडे ग्रामस्थांची चिंता वाढविणारी आहे

एमपीसीन्यूज : भारतीय नौदलाचे प्रशिक्षण केंद्र असलेल्या आयएनएस शिवाजी येथे नव्याने दाखल झालेल्या तीन तरुणांना आज, सोमवारी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे स्वॅब तपासणी अहवाल आज पाॅझिटिव्ह आले असून त्यांच्यावर कमांड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तीन दिवसापूर्वी येथील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. आजच्या तीन जणांची मिळून या केंद्रातील रुग्णांची संख्या सात झाली आहे. आयएनएस शिवाजीमधील रुग्णांची वाढती संख्या लोणावळा व कुरवंडे ग्रामस्थांची चिंता वाढविणारी आहे.

मूळ हरियाणा आणि मथुरा उत्तरप्रदेश येथील दोन 19 वर्षीय तरुण व अनंतपूर आंध्र प्रदेश येथिल 20 वर्षीय तरुण प्रशिक्षणासाठी दि. 10 जून रोजी आयएनएस शिवाजी कॅम्पसमध्ये आले होते.

19 जुन रोजी येथिल तीन तरुणांना व 21 जून रोजी एका तरुणाचा वैद्यकीय अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले होते. आज, सोमवार नवीन तीन प्रशिक्षणार्थी तरुणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले.

वानवडी येथिल कमांड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 10 जून रोजी आयएनएस शिवाजी कॅम्पसमध्ये आलेल्या प्रशिक्षणार्थींना कॅम्पसमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. 19 जून रोजी प्रथम तीन जणांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना कोंढवा येथील लष्करी रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

दरम्यान, त्यांच्या संपर्कातील इतर चार जणांचा तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने कुरवंडे व लोणावळा व परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुरवंडे गावातील अनेक जण आयएनएस शिवाजीमध्ये कामाला आहेत. मावळातील कोरोना रुग्णांची संख्या 57 झाली आहे. यापैकी 26 सक्रिय रुग्ण असून 29 जण बरे झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.