Lonavala: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लोणवळा शहर 31 मार्चपर्यंत बंद

एमपीसी न्यूज – कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून लोणावळा शहर 31 मार्च पर्यत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

कोरोना या संसर्गजन्य आजारांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देश महाराष्ट्रासह पुणे व मुंबई भागांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नुकतेच एका आदेशाने पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनांना दिल्या आहेत. लोणावळा शहर हे पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने मुंबई पुण्यासह देशभरातून या ठिकाणी पर्यटक येत असतात. या येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून लोणावळा शहरांमध्ये कोरोना या आजाराचा संसर्ग होऊ नये याकरिता खबरदारी घेण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तू किराणा दुकाने भाजीपाला दूध व औषधे वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, चिक्कीची दुकाने, हातगाड्या, फेरीवाले, पथारी व्यावसायीक यांना दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विविध देशांतून लोणावळ्यात आलेल्या 16 जणांना त्यांच्या घरामध्येच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून नगर परिषदेचे आरोग्यपथक रोज यांची माहिती घेत आहेत. वरील पैकी कोणालाही कोरोना आजाराची लागण झालेली नाही मात्र खबरदारी म्हणून त्यांची तपासणी केली जात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून कसलेही मेसेज व्हायरल करू नये असे आव्हान लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन यांनी केले आहे. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, आरोग्य समिती सभापती सिंधू परदेशी, मुख्याधिकारी सचिन पवार यांनी संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता वाॅर्ड निहाय पावडर फवारणी सुरु केली आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने लोणावळा शहराची अर्थव्यवस्था कोलमडली असली तरी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी देखील कामाशिवाय घराबाहेर पडू नये कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून जाऊ नये असे आव्हान लोणावळा नगरपरिषद प्रशासन व नगराध्यक्षा यांनी केले आहे.

नगरपरिषद शाळा क्र. 1 मध्ये विलगीकरण कक्ष

लोणावळा नगरपरिषदेच्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्र. 1 मध्ये कोरोना रुग्नांकरिता विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी 20 बेडची व्यवस्था करण्यात आली असून तालुका आरोग्य विभागाने याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांची टिम उपलब्ध कर‍ावी अशी मागणी नगरपरिषदेने केली आहे.

 शिवसेनेकडून जनजागृती पत्रकांचे वाटप

कोरोना या आजाराची माहिती व तो रोखण्याकरिता नागरिकांनी घ्यावय‍ची काळजी व उपाययोजना याची माहिती देणारे पत्रक लोणावळा शहर शिवसेनेने प्रसिध्द केले असून त्याचे घरोघरी वाटप करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला संघटक शादान चौधरी व शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांनी सदरचे पत्रक बनविले असून त्यांच्या माध्यमातून जनजागृती सुरु केली आहे.

ग्रामीण भागातील खाजगी व्यावसाय सुरुच

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लोणावळा शहरात विविध उपाययोजना केल्या जात असताना ग्रामीण भागातील अनेक खाजगी व्यावसाय आज देखिल सुरु आहेत. काही हाॅटेल व रेस्टाॅरंट सुरु आहेत. वाकसई गावाच्या हद्दीमध्ये एका वाहन शोरुमध्ये 50 हून अधिक कर्मचारी काम करत असताना त्यांना मात्र वर्क फाॅर होम ची सुविधा न देता कामावर थांबविण्यात येत आहे. वाहन खरेदी अथवा चौकशी करिता येणार्‍या ग्राहकांच्या माध्यमातून कर्मचार्‍यांना कोरोना आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ग्रामीण भागात देखिल लोणावळा ग्रामीण पोलीस प्रशासन व तालुका प्रशासन, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच व सदस्य यांनी विशेष लक्ष देत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाहीत याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.