Lonavala : सलग सुट्टयांमुळे एक्सप्रेस वेचा वेग मंदावला

वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज- शनिवार रविवारच्या सुट्टयांना जोडून आलेली महाशिवरात्रीची सुट्टी यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने खासगी वाहनातून घराबाहेर पडल्याने पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर भल्या पहाटेपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागेल आहेत. अचानकपणे वाहनांची संख्या वाढल्याने एक्स्प्रेस वेचा वेग सकाळपासून मंदावला आहे.

खालापूर टोल नाक्यावर लांबवर वाहनांच्या रांगा लागल्याने फास्ट टॅगपासून सर्वच यंत्रणा कोलमंडली आहे. टोल भरण्याकरिता वाहनांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. तर दुसरीकडे खंडाळा घाट चढायला सुरुवात केल्यानंतर फुडमाॅल ते खंडाळा दरम्यान मुंगीच्या वेगाने वाहने पुढे सरकत आहेत.

वाहनांची संख्या वाढल्याने वेग कमी झालेला असताना घाटाचा अवघड टप्पा चढताना काही ठिकाणी अवजड वाहने बंद पडणे, गरम होणे असे प्रकार होत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तीन दिवस सलग सुट्टया मिळाल्याने अनेकांनी लोणावळ्यासह कोल्हापुर, महाबळेश्वर, भीमाशंकर, शिर्डी, पंढरपुर आदी पर्यटनस्थळी तसेच देव दर्शनाचा बेत आखत घराबाहेर पडणे पसंत केले. वाहतूक कोंडी टाळण्याकरिता सर्वजण बाहेर पडल्याने सकाळीच घाट परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. बोरघाट पोलीस व खंडाळा टॅप पोलीस वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता प्रयत्न करत असले तरी ते वाहनांच्या संख्येपुढे कुचकामी ठरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.