Lonavala : शहरासह परिसरातील ‘ग्रामपंचायतीं’चा दोन दिवस लाॅकडाऊन: बाजारपेठत कडकडीत बंद

कुसगाव, कुणेगाव, वरसोली, वाकसई ग्रामपंचायत यांचा समावेश

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरात आज सोमवार आणि मंगळवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला आहे. याच धर्तीवर परिसरातील कुसगाव ओळकाईवाडी ग्रुप ग्रामपंचायत, कुणेनामा ग्रामपंचायत, वरसोली ग्रामपंचायत, वाकसई ग्रुप ग्रामपंचायत यांनी देखील ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला. लोणावळा बाजारपेठ आज सोमवारी कडकडीत बंद होती.

राज्यात विशेषतः मुंबई व पुण्यात कोरोनाने थैमान घातले असताना लोणावळा व मावळात कोरोनाला रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र बाजारभागात सकाळी व संध्याकाळी नागरिकांची होणारी गर्दी चिंता वाढविणारी असल्याने शहरातील व्यावसायकांनी सोमवार व मंगळवार बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोणावळा नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने देखील बाजारपेठेत बिनाकामाचे कोणी येणार नाहीत? याकरिता कृष्णाई हाॅटेल चौक, भांगरवाडी इंद्रायणी पूल व कैलासनगर येथे नाकाबंदी केली आहे. सर्व वाहनांची कसोशीने चौकशी करत संचारबंदीचे गुन्हे देखील दाखल करायला सुरुवात केली आहे.

कुसगाव ग्रामपंचायत हद्दीत शनिवार ते मंगळवार असा चार दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जंतूनाशक फवारणी करण्यात आली असून अडीचशे गोरगरिबांना धान्य वाटप करण्यात आले असल्याचे सरपंच छाया डफळ व सदस्य दादा डफळ यांनी सांगितले. ग्रामपंचायत वाहन ग्रामपंचायत हद्दीत फिरून नागरिकांना कोरोना बाबत जनजागृती करत आहे.

कुणेनामा ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच संजय ढाकोळ यांनी दानशूर व्यक्तीच्या मदतीने साडेपाचशे नागरिकांना अन्नधान्य व सॅनिटायझर बाॅटलचे वाटप केले. लोणावळा शहराप्रमाणे सोमवार व मंगळवार येथे देखील जनता कर्फ्यू पाळला आहे. वरसोली व वाकसई ग्रामपंचायतीच्या वतीने गावांमध्ये जंतूनाशक फवारणी व दानशूर व्यक्तीच्या मदतीने सर्वसामान्यांना धान्य वाटप केले आहे. सोमवार व मंगळवार ह्या भागात देखिल लाॅकडाऊन पाळण्यात आला आहे.

लाॅकडाऊन हा आपल्या करिताच असल्याने त्याचे सर्वांनी पालन करा असे आवाहन वरसोली गावच्या सरपंच सारिका खांडेभरड, माजी उपसरपंच संजय खांडेभरड व वाकसई गावचे सरपंच दीपक काशीकर, उपसरपंच गणेश देशमुख, माजी उपसरपंच मनोज जगताप यांनी नागरिकांना केले आहे. कुरवंडे ग्रामपंचायतीने 9 व 10 एप्रिल रोजी जनता कर्फ्यू पाळत गावात जंतूनाशकाची फवारणी केली. कार्ला ग्रामपंचायतीमध्ये देखील तिन दिवसांपासून लाॅकडाऊन पाळण्यात आला.

शहरातील व गावांमधील सर्व भाजीपाला व किराणा दुकाने आज व उद्या बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडताना स्वतः:ची व कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, हात सतत धुवावेत, बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवावे, तसेच कपडे व इतर साहित्य वेगळे ठेवावे, मास्क लावल्याशिवाय घराबाहेर जाऊ नये असा सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.