Lonavala : महिलेसह एकाला बेकायदेशीरपणे दारू विकताना 10 लाखाच्या मुद्देमालासह अटक

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरातील मावळा पुतळा चौक ते महावीर चौक दरम्यान बेकायदेशीरपणे दारु विक्री करण्याकरिता आलेल्या दोन जणांना लोणावळा शहर पोलिसांनी सापळा लावून दहा लाखाच्या मुद्देमालासह अटक केली. बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

ओमकार अनंत भंडारे (वय-19, राहणार वरसोली टोलनाक्याजवळ, ता.मावळ जि पुणे) व रेश्मा शंकर पाठारे (वय-34, राहणार दत्त मंदिरासमोर, औंढे ता.मावळ जि पुणे) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) व 108 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस नाईक अमोल कसबेकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

भंडारे व पाठारे हे मारूती सुझुकी ब्रिजा कार क्रमांक (एम.एच/14/एफ.एक्स/7786) मधुन मोठ्या प्रमाणात दारुसाठा घेऊन औंढे गावात विक्रीकरिता घेऊन जात असल्याची माहिती लोणावळा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर सदर गाडी अडवत वाहन तपासणी केली असता गाडीमध्ये बिअरचे 20 बाँक्स, व देशी विदेशी मद्याच्या 436 बाटल्या असा 83 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.

शहर पोलिसांनी दारु व वाहन असा सुमारे 9 लाख 83 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली. मागील महिन्यात देखील खत्री फार्म वलवण याठिकाणी लोणावळा शहर पोलिसांनी बेकायदेशीरपणे विक्री करिता आणलेली दारु मोठ्या प्रमाणात पकडली होती. लोणावळा शहर पोलिसांनी अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली असून दोन दिवसापूर्वी पांगळोली भागात एका हातभट्टीवर कारवाई तसेच खत्री पार्क येथील एका बंगल्यात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.