Lonavala : गावकऱ्यांनो, गावचे बंद केलेले रस्ते खुले करा -तहसीलदार

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ विषाणूचा वाढत फैलाव रोखण्यासाठी सध्या देशात ‘लॉकडाऊन’ केले आहे. ‘कोरोना’बाधित रुग्णांमध्ये मुंबई आणि पुणे येथील लोक अधिक आहेत. सध्याच्या ‘लॉकडाऊन’मुळे काहींनी शहरात राहण्याऐवजी जाणे योग्य मानत आहेत. मात्र, ‘कोरोना’ विषाणूचा गावातही अधिक प्रसार होईल, म्हणून मावळ तालुक्यातील काही गावांनी गावात येणारे रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनो, हे वागणं बरं नव्ह, अशी भावना व्यक्त होत आहे. तर, गावकऱ्यांनो, गावांचे बंद केलेले रस्ते खुले करा, असे आवाहनही तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे.

गावांमध्ये बाहेरील नागरिक येऊ नयेत. तसेच गावातील नागरिक गावाबाहेर जाऊ नये, याकरिता मावळ तालुक्यात अनेक गावांच्या वेशी गावकर्‍यांनी दगड व बांबू बांधून बंद केले आहे. देशात आणि राज्यात सर्वत्र संचारबंदी असली तरी जीवनावश्यक सेवांची वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. वेशी बंद केल्याने जीवनावश्यक वस्तु व अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या व्यक्ती यांना अडचणी येत आहे. त्यामुळे हे रस्ते मोकळे करावेत, अशा सूचना संबंधित पोलीस अधिकार्‍यांना दिल्या असल्याचे मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले.

लाॅकडाऊन आणि संचारबंदी काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, कोणतेही वाहन रस्त्यावर येणार नाही याची खबरदारी घेतली जात असली तरी जीवनावश्यक वस्तु व अत्यावश्यक सेवा यांना मात्र रस्ते वाहतुक सुरु आहे. गावाच्या वेशी बंदमुळे त्यांचा अडचण होणार असल्याने सदरचे रस्ते मोकळे करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.