Lonavala : आंतरराष्ट्रीय स्लॅकलाईन गॅदरींगमध्ये मोडणार जागतिक विक्रम; स्लॅकलाईन खेळाडू चालणार 1.3 किलोमीटर

एमपीसी न्यूज – लोणावळा येथे आंतरराष्ट्रीय स्लॅकलाईन गॅदरिंगचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरात स्लॅकलाईन या साहसी क्रीडा प्रकारात आजवर झालेले जागतिक रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. जगभरात आजपर्यंत एक किलोमीटर हवेत दोरीवरून चालण्याचा विक्रम झाला आहे. मात्र, लोणावळा येथे सव्वा किलोमीटर पेक्षा अधिक लांब चालण्याचा विक्रम होणार आहे. 8 ते 18 जानेवारी 2020 या कालावधीत हा साहसी क्रीडा प्रकार ड्युक्स नोज (नागफणी) पायथा, कुरवंडे, लोणावळा येथे होत आहे.

शिवदुर्ग मित्र, लोणावळा आणि स्लॅकलाईन इंडीया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा येथे देश विदेशातील स्लॅकलायनर, हायलाईनर यांनी एकत्र येत या ट्रेनिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काही प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील 10 खेळाडू आणि भारतातील अनेक खेळाडू यात सहभागी होणार आहेत.

शिवदुर्ग मित्र, लोणावळा ट्रेकिंग अॅडव्हेंचर हा क्लब ट्रेकिंग, क्लायबींग, रेस्क्यू, अॅनिमल रेस्क्यू , सांस्कृतिक, फिटनेस, सायकलिंग, कबड्डी या विविध क्षेत्रात कार्यरत आहे. क्लबतर्फे दररोज शालेय विद्यार्थ्यांना साहसी क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. साहसी क्रीडा प्रकारांमध्ये दोरावरून चालणे (स्लॅकलाईन) हा प्रकार भारतात प्रचलीत होत आहे.

दोन उंच डोंगरावर दोरी बांधून त्यावर बॅलन्स करत चालणे, याला हायलाईन म्हटले जाते. या साहसी क्रीडा प्रकारात भारतात प्रथम हायलाईन करण्याचा मान शिवदुर्गचे संचालक रोहीत वर्तक यांनी मिळवला आहे. रोहीत यांनी हा क्रिडा प्रकार वाढवण्यासाठी अनेक खेळाडू तयार केले आहे. यातूनच लोणावळा येथे होत असलेल्या स्लॅकलाईन, हायलाईनर ट्रेकिंग या क्रीडा स्पर्धांचा उदय झाला आहे.

आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी यापूर्वी सुमारे एक किलोमीटर लाईनवर चालून विश्वविक्रम केलेले आहेत. लोणावळा येथे होत असलेल्या स्लॅकलाईनमध्ये सुमारे 1.3 किलोमीटर लाईन लावून ते खेळाडू स्वतःचे विक्रम तोडतील. सुरक्षेचे सर्व उपाय करून हा खेळ खेळला जाणार आहे. या खेळाचा आनंद घेण्यासाठी ड्युक्स नोज (नागफणी) पायथा, कुरवंडे, लोणावळा येथे परिसरातील क्रीडा प्रेमींना जावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.