Lonavla Crime News : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग करणार्‍या लोणावळा विभागातील 39 हाॅटेल्सवर कारवाई

एमपीसी न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वे जिल्हाधिकारी पुणे यांनी सर्व व्यावसायिक अस्थापना रात्री 10 नंतर बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असताना देखील या आदेशाचा भंग करत लोणावळा विभागात रात्री उशिरापर्यत हाॅटेल चालू ठेवणार्‍या तब्बल 39 व्यावसायकांवर लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांनी शनिवारी रात्री कारवाया केल्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसापुर्वीच पुण्यात बैठक घेत नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाला केल्या होत्या. प्रशासकीय पातळीवर कारवाई होत नसल्याने व्यावसायिक अस्थापना रात्री उशिरापर्यत सुरु असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत होते.

_MPC_DIR_MPU_II

अनेक माध्यमांनी यावर आवाज उठविला मात्र स्थानिक प्रशासन असो व पोलीस ठाण्याचे प्रभारी यांच्याकडून अपेक्षित कारवाया झाल्या नाहीत. शनिवारी रात्री लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांनीच विशेष मोहिम हाती घेत लोणावळा शहर पोलीस ठाणे, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे, कामशेत पोलीस ठाणे व वडगाव मावळ पोलीस ठाणे या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रात्री उशिरा ह्या कारवाया केल्या. तब्बल 39 अस्थापना रात्री उशिरापर्यत खुल्या दिसल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाने 27 मार्च च्या रात्रीपासून 15 एप्रिलपर्यत रात्रीचा कर्फ्यू तसेच जमावबंदी लावली आहे. तसेच दुकाने व व्यावसायिक अस्थापना रात्री 8 वाजता बंद करण्याचे सूचित केले आहे. यासह लग्न समारंभ 50 जणांची उपस्थिती, अंत्यविधी 20 जणांची उपस्थिती, शाळा महाविद्यालये बंद, दुकानांसमोर पाच पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे, मास्क न लावल्यास 500 रुपये दंड आदी सूचनांचा यामध्ये समावेश आहे.

पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील कोरोनाचा सर्वात मोठा हाॅटस्पाॅट झाला आहे. तर मावळ तालुक्यातील ग्रामीण भागासह तळेगाव दाभाडे, लोणावळा, वडगाव, कामशेत या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने सर्वांनी नियमांचे पालन करावे,  असे आवाहन सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.