Lonavala : थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करिता लोणावळा हाऊसफुल्ल 

 राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन व नवीन वर्षाच्या स्वागताकरिता लोणावळा व परिसर पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल झाला आहे. आज सकाळपासूनच लोणावळा शहरात राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. द्रुतगती महामार्गाचा वेग देखील काही काळ मंदावल्याचे चित्र पहायला मिळाले. सर्वच पर्यटनस्थळांवर आज पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.
लोणावळा शहरात मागील दोन तीन दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीचा आनंद घेण्यासोबत येऊ घातलेले थर्टी फस्ट सेलिब्रेशन व नवीन वर्षाचे जल्लोशात स्वागत करण्याकरिता मुंबई पुण्यासह विविध राज्यातील पर्यटकांनी शहरात गर्दी केली आहे. यामुळे लोणवळा परिसरातील बहुतांश हॉटेल, खासगी बंगलो, फार्म हाऊस, सॅनेटोरियम ही पर्यटकांनी फुल्ल झाली आहेत. शहरात पर्यटकांना आकर्षित करण्याकरता जवळपास तीसहून अधिक व्यावसायिकांनी मनोरंजनाचे परवाने घेतले आहेत. मुंबई पुणे हमरस्त्यावरील लोणावळा हे थंड हवेचे महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागताकरिता व्यावसायिकांसह स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पर्यटकांनी शहरात यावे, येथील पर्यटनस्थळांचा व निसर्गाचा मनमुराद आनंद कायद्याच्या चौकटीत राहून घ्यावा असे आव्हान पोलिस निरीक्षक बी.आर.पाटील व रामदास इंगवले यांनी केले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकरिता पुढील 48 तास पोलीस सतर्क राहणार आहेत. पर्यटकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागू नये याकरिता वाहतुक विभागाच्या कर्मचार्‍यांसह येथिल शिवदुर्ग मित्र व शहरातील काही संस्थाचे सदस्य व नागरिक असे सुमारे 35 ते 40 जण पोलीसांना पोलीस मित्र म्हणून सहकार्य करत आहेत. पर्यटकांनी देखिल नियमांचा भंग न करता येथिल निसर्गाचा, पर्यटनाचा तसेच मनोरंजन कार्यक्रमांचा आनंद घ्यावा. लोणावळा परिसरातील लायन्स पाॅईट, भुशी धरण, राजमाची ग‍ार्डन, ड्युक्स नोज, पवनाधरण, कार्ला व भाजे लेणी, लोहगड किल्ला परिसरात पर्यटकांनी गर्दी केली आहे. 

                                                                  
मद्य प्राशन करुन वाहने चालविणार्‍या मद्यपी चालकांवर तसेच विना परवाना दारु वाहतुक करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. वलवण, खंडाळा तसेच रायवुड याठिकाणी याकरिता चेकनाके ल‍ावण्यात आले आहेत. लायन्स पाॅईट तसेच पवनाधरण परिसरात वन विभागाच्या जागेत होणार्‍या खाजगी पार्ट्यांवर वन विभाग तसेच राज्य उत्पादनशुल्क व पोलीस प्रशासन नजर ठेवून आहे. गड किल्ले परिसरात मद्यपींचा उच्छाद टाळण्याकरिता गडप्रेमी संघटना यांचा पहारा यापरिसरांमध्ये असणार असल्याने मद्यपींनी सार्वजनिक ठिकाणी धांगडधिंगा न घालता शांततेमध्ये थर्टीफस्ट सेलीब्रेशन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.