Lonavla : वरसोली टोलनाक्यावरील पोलिस बंदोबस्तात वाढ; खासगी प्रवासी वाहतूक बंद

एमपीसी न्यूज : कोरोना संसर्ग टाळण्याकरिता जमावबंदी व संचारबंदी लागू करुन देखिल नागरिक घराबाहेर पडत असल्याने या नागरिकांना आळा घालण्यासोबत टोलनाक्यावरुन अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांची वाहतूक वगळता सर्व प्रवासी वाहतूक बंद करण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी टोलनाक्यावरील बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे.

आता या टोलनाक्यावर राज्य राखीव दलाची तुकडी टोलनाक्यावर तैनात करण्यात आली आहे.त्यामुळे विनाकारण फिरणार्‍यांनो सावधान, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कोरोना संसर्गचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देशासह राज्यात संचारबंदी केली असून १४ एप्रिल पर्यंत भारत लाॅकडाऊन असणार आहे.

लाॅकडाऊन असताना देखिल शहरी भागातील कामगार हे रात्रीच्यावेळी खासगी वाहनांमधून गावाकडे जात आहेत, तर काही जण पायीच गावी निघाले आहेत. तसेच अनेक स्थानिक युवक विनाकारण गाड्या घेऊन फिरत कायदा मोडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाचे (सीआरपीएफ) शंभर जवान तैनात करण्यात आले असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक संदिप घोरपडे व उपनिरीक्षक निरंजन रनावरे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि पोलिसांना सुरक्षेविषयी कठोर पाऊल उचलण्यास भाग पाडू नये. ह्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक नागरिकांना लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप घोरपडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.