lonavla-ऐतिहासिक वास्तुंचे जतन करण्यासाठी रविवारी भाजे लोहगड दरम्यान संपर्कचा हेरिटेज वाॅक

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तुंचे जतन व्हावे तसेच, त्यांची युनेस्कोच्या य‍ादीत नोंद व्हावी याकरिता येत्या रविवारी (दि.25) रोजी संपर्क बालग्राम या संस्थेच्या वतीने भाजे लेणी ते लोहगड किल्ला दरम्यान करण्यात आले होते. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार संभाजी महाराज, अभिनेत्री गिरिजा ओक, संपत स्वरुप, परेश र‍ावल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि जवळपास सहा ते सात हजार दुर्गप्रेमी, निर्सगप्रेमी आणि नागरिक या वाॅकमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संपर्क संस्थेचे सचिव अमितकुमार बॅनर्जी यांनी दिली.

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत दडलेल्या भाजे लेणी ते लोहगड किल्ला दरम्यान या वाॅकचे आयोजन करण्यात आले आहे.मावळ तालुक्यातील भाजे लेणी, कार्ला लेणी, बेडसे लेणी, लोहगड किल्ला आणि विसापूर किल्ला या पुरातन आणि ऐतिहासिक वास्तूंची युनेस्कोमध्ये नोंद होऊन या भागाचा पर्यटनात्मक दृष्टया विकास व्हावा या करिता भाजे लेणीच्या पायथ्याशी असलेल्या संपर्क बालग्राम या अनाथाश्रम चालवणाऱ्या संस्थेच्यावतीने मागील तीन वर्षांपासून हेरिटेज वाॅक ही नावीन्यपूर्ण संकल्पना समाजासमोर ठेवली आहे. अतिशय प्राचीन आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी कार्ला, भाजे आणि बेडसे लेणी सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल इतिहासाचे साक्षीदार असलेले लोहगड आणि विसापुर या किल्ल्यांचा पर्यटनात्मक दृष्टया विकास झाल्यास आजूबाजूच्या ग्रामीण भागासह मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. तसेच या ऐतिहासिक वास्तूंचे कायमस्वरूपी जतन झ‍‍ाल्यास येणार्‍या भावी पिढीकरिता तो अनमोल ठेवा असेल या उद्देशाने संपर्क संस्थेच्या वतीने हेरीटेज वॉक सुरू करण्यात आला आहे. भाजे लेणी ते लोहगड किल्ला असा साधारण साडेतीन किलोमीटर अंतराचा हा वॉक असून यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहून इतिहासाच्या पाऊलखुणा तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीचे दर्शन होणार आहे. वॉकदरम्यान नागरिकांना वासुदेव, सोंगाडी, पोवाडे म्हणणारे शाहिर, जात्यावर दळण दळणार्‍या ग्रामीण महिला, भजन, किर्तन, मल्लखांब, लाठीकाठी, तलवारबाजी, सांस्कृतिक कार्यक्रम पहायला मिळणार आहेत . सोबतच भाजलेले शेंगदाणे, उकडलेले मक्याचे कणीस, वडापाव, चहा आणि सरते शेवटी वांग्याचे भरित, ठेचा आणि पिठंल भाकरीचा मराठमोळा मेजवानीचा बेत सहभागी नागरिकांना मिळणार आहे. लोहगडाच्या पायथ्याजवळ इतिहासकालिन शस्त्रांचे प्रदर्शनहि पहायला मिळणार आहे. यामध्ये महाराजांच्या काळातील दुर्मिळ अशी जवळपास साडेआठशे शस्त्र या प्रदर्शनामध्ये पहायला मिळतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.