London: कोरोनावर मात केल्यानंतर बोरीस जॉन्सन पंतप्रधान कार्यालयात दाखल

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूवर मात केल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे ‘डाऊन स्ट्रीट’ला परत आल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. डाऊन स्ट्रीट येथे ब्रिटनच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान व कार्यालय आहे. कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर बोरीस जॉन्सन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर 12 एप्रिलला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर ते खासगी निवासस्थानातून काम करत होते. 14 दिवसांचा कालावधी संपल्यामुळे बोरीस जॉन्सन लंडन येथील त्यांच्या अधिकृत पंतप्रधान निवासात परतले असून आजपासून (सोमवार) ते नियमित कामकाज सुरू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

इंग्लंडमध्ये काल (रविवारी) गेल्या महिनाभरातील एका दिवसातील सर्वात कमी कोरोना मृतांची नोंद झाली. रविवारी 413 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे इंग्लडमधील मृतांचा एकूण आकडा 20 हजार 732 झाला आहे. यापूर्वी 31 मार्चला इंग्लंडमध्ये 381 मृतांची नोंद झाली होती. त्यानंतर प्रथमच हा आकडा इतका कमी झाल्याचे दिसून येत आहे. इंग्लंडमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 52 हजार 840 पर्यंत वाढली आहे. कोरोनामुळे एका दिवसात होणाऱ्या मृत्यूंच्या आकड्यांमध्ये अमेरिकेनंतर इंग्लंडचाच क्रमांक लागत होता. त्यामुळे चिंता वाढत असतानाच रविवारी मृतांचा आकडा निम्म्याने कमी झाल्याची तसेच पंतप्रधानांच्या यशस्वी परतीची अशा दोन चांगल्या बातम्या ब्रिटनच्या नागरिकांना मिळाल्या आहेत.

इंग्लडमधील कोरोना संकटामुळे बिघडलेली परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. इंग्लंडमध्ये 23 मार्चला प्रथम लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्याला 16 एप्रिलला मुदतवाढ देण्यात आली होती. सात मेला परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनबाबत पुढे चालू ठेवायचा की शिथिल करायचा याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे पुन्हा कार्यालयात रुजू झाल्याने देशवासीयांचे मनोबल वाढल्याचे मानले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.