Pune : पुण्यातून निघणार शिक्षण व रोजगार हक्कासाठी लाँग मार्च 

एमपीसी न्यूज – छात्रभारती, राष्ट्र सेवा दल, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण व रोजगार हक्कासाठी लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती छात्रभारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे, राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री विनय सावंत, मधुकर निलफराके आणि संघटक लोकेश लाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

हा लाँग मार्च दि १५ ते २१ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. मोर्चाची सुरुवात गुरुवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता महात्मा फुले वाडा येथून होणार आहे. यावेळी जेष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष  सुरेश खैरनार आणि शिक्षक आमदार कपिल पाटील उपस्थित राहणार आहेत. हा लाँग मार्च २१ नोव्हेंबर रोजी मुंबईत मंत्रालयात पोहचणार आहे. या लाँग मार्च मध्ये राज्यातील हजारो ग्रामीण युवक, दलित, आदिवासी, वंचित विद्यार्थी सहभागी होणार असून जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरून पायी मोर्चा जाणार आहे.

शासनाने मराठी शाळा ठरवून बंद पाडल्या आहेत. शासनाच्या विविध विभागातील अडीच लाखाहून अधिक पदे रिक्त असताना ही नोकरभरती बंद आहे. त्यामुळे शासनाने निवडणुकीपूर्वी हे दोन्ही विषय मार्गी लावावेत, तसेच शालेय विद्यार्थ्यांना एस टी चा मोफत पास देण्यात यावा अशी प्रमुख मागणी असल्याचे ही सावंत यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.