Loni Kalbhor : कारच्या भीषण अपघातात 9 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज- रायगड येथे फिरण्यास गेलेल्या तरुणांच्या कारला अपघात होऊन कार मधील ९ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात आज पहाटे १ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कदम वाकवस्ती येथे घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थी असून यवत येथील रहिवाशी आहेत. रायगड पाहून परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला

अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव व जुबेर अजिज मुलाणी अशी मृत तरुणाची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल, शुक्रवारी (दि. 19) सकाळी सर्वजण यवत येथून रायगड येथे फिरण्यास गेले होते. रायगड पाहून सर्वजण घरी परत येत होते. पुणे सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर त्यांच्या एर्टिगा कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दुभाजक ओलांडून समोरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारमधील 9 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे तब्बल दोन किलो मीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या.

दत्ता गणेश यादव हा उंड्री भागातील जेएसपीएमएस महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. निखिल चंद्रकांत वाबळे हा लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्येबाउन्सर म्हणून काम करीत होता. विशाल सुभाष यादव हा वाघोली गावातील जेएसपीएमएस महाविद्यालयात शिकत होता. शुभम भिसे हा उरळी कांचन जवळील कासुर्डी गावातील महात्मा गांधी महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत होता. अक्षय चंद्रकांत दिघे हा हडपसरमधील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात बीएससीच्या शेवटच्या वर्षाला होता. नुर मोहम्मद दारा हा लोणी काळभोर मधील महाविद्यालयात बी ए च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. परवेज अशपाक आत्तार आझम कॅपसमधील पूना कॉलेजमधे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. अक्षय वायकर याचा स्वतःचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय होता. तर जुबेर मुलाणी लोणी काळभोर जवळ नोकरी करत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.