Loni Kalbhor News : धक्कादायक ! अंत्यविधीसाठी शंभरावर लोकांची उपस्थिती, नातेवाईकांनी मृताचे पाय धुऊन पाणी प्यायले 

एमपीसीन्यूज  :  कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये लग्न सोहळ्यासाठी पंचवीस आणि अंत्यविधीसाठी फक्त वीस लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. परंतु असे असले तरी नागरिक याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन एक असाच प्रकार उघडकीस आला. एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीला अनेक लोकांनी उपस्थिती लावली. तसेच अंत्यविधी करताना नातेवाईकांनी मयत व्यक्तीचे पाय धुऊन ते पाणीही प्यायले.

या संपूर्ण घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने सोशल मीडियावर  पोस्ट टाकून  हा सर्व प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर लोणी काळभोर  पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करून जर कोणी लग्न सोहळा,  अंत्यसंस्कार करत असतील तर नागरिकांनी त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिस तातडीने घटनास्थळी उपस्थित राहून संबंधितावर कारवाई करतील, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.