Lonikand : जबरी चोरी करणारे दोन सराईत चोरटे जेरबंद

एमपीसी न्यूज- लोणीकंद येथे एका पादचाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील ऐवज लुटून फरार झालेल्या दोन सराईत गुन्हेगारांना पिंपळनेर व श्रीगोंदा येथून अटक केली. लोणीकंद पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

तुषार रखमाजी पवार (वय 19 रा. पिंपळनेर ता. पारनेर जि. अहमदनगर), राजू विजय तुपे (वय 22 रा.आवटेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या प्रकरणी पंकज कुमार त्रिभुवन प्रजापती (वय 24) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज कुमार हे 7 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लोणीकंद येथील महाराष्ट्र बँकेसमोरून लोणीकंद माथा येथे पायी चालत जात असताना मोटर सायकलवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी पंकज कुमार यांना थांबवून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील 12,000 रुपये रोख रक्कम व रेडमी कंपनीचा मोबाइल हँडसेट व एक जिओ कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून मोटारसायकलवरून पळ काढला. आरोपी तुषार रखमाजी पवार याच्या विरोधात श्रीगोंदा, रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय गिरमकर, दयानंद लीमन, हवालदार सचिन गायकवाड, हवालदार राजापुरे, बाळासाहेब सकाटे,समीर पिलानी, ऋषिकेश व्यवहारे, श्रीमंत होनमाने, सुरज वळेकर पोलीस नाईक ज्ञानेश्वर क्षीरसागर, जनार्दन शेळके, एम आय मोमीन यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.