Lonavala News: पर्यटकांमुळे लोणावळ्यात कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्या – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – पावसाळ्यात लोणावळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. कोरोना काळात व्यापाऱ्यांचीही परिस्थिती अवघड झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत पर्यटन व्यवसाय टिकविणे आणि कोरोनाचा प्रसार होऊ न देणे ही दुहेरी कसरत पार पाडावी लागणार आहे. पावसाळ्यात पर्यटकांमुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत.

लोणावळा नगरपरिषद विभागातील कोरोना परिस्थितीचा खासदार बारणे यांनी आढावा घेतला. तसेच खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स नगरपरिषदेला भेट देण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, शिवसेना गटनेत्या शादान चौधरी, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, शहरप्रमुख बाळासाहेब पाठक, नगरसेवक शिवदास पिल्ले, नगरसेविका कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड उपस्थित होते.

लोणावळा नगरपरिषद उभारत असलेल्या कोविड सेंटरला खासदार बारणे यांनी भेट दिली. ऑक्सिजन पाइपलाइनचे काम व्यवस्थित पूर्ण करावे. कोणत्याही त्रुटी राहता कामा नयेत याची दक्षता घेण्याची सूचना केली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील कोरोनाची परिस्थिती चांगल्या प्रकारे नगरपरिषदेने हाताळली आहे. त्यानिमित्त प्रशासनाचे अभिनंदन केले. संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे. पावसाळ्यात राज्यासह विविध भागांतील पर्यटक लोणावळ्याला येतात. पर्यटकांमुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. त्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही खासदार बारणे यांनी केल्या.

दरम्यान, खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव मावळ (कान्हे) या कोविड रुग्णालयास दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स भेट देण्यात आले. या प्रसंगी मुख्य वैद्यकीय अधिक्षक डॅा.जयंश्री ढवळे, अरोग्य वैद्यकीय आधिकारी डॅा.चंद्रकांत लोयारे, नायब तहसिलदार रावसाहेब चाटे, बीडीओ भागवत, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, डॅाक्टर्स, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.