Pune News : उद्योजकतेकडे करियर म्हणून पहा – सुरेश लोंढे 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) पुणे यांनी संयुक्तपणे उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. शनिवारी (दि.5) गुगल मिटद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना उद्योजकता विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना उद्योगांसाठी मदत करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.  

या कार्यक्रमात एमसीईडी मुंबईचे वरिष्ठ उद्योग अधिकारी सुरेश लोंढे तसेच दीपक भिंगारदेव, सुनील शेटे, एसएम कुंभार व 100 विद्यार्थी सहभागी झाले होते.

वरिष्ठ उद्योग अधिकारी सुरेश लोंढे म्हणाले, ‘आताच्या विद्यार्थ्यांसमोर उद्योजकतेचे अनेक पर्याय आहेत. उद्योजकतेकडे करियर म्हणून पहा. वेगवेगळ्या वाटा खुल्या आहेत, मात्र लवकर उद्योग सुरु करा. उद्योजकीय मानसिकता तयार करा. उद्योगात आपण घरातील सदस्यांना, मित्रांना सामावून घेऊ शकता. विद्यार्थी दशेपासूनच रोज एक तास उद्योजकतेसाठी दिला पाहिजे. महाराष्ट्र उद्योजकता केंद्र सर्व शासकीय योजना आणि मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहील.’

दीपक भिंगारदिवे म्हणाले, ‘छोट्या कामातून उद्योजकतेपासून सुरुवात करा.कमी कर्ज घ्या. प्रथम अनुभव घ्या. स्वतःच्या उद्योगात नोकरी सारखे राबा. चांगल्या नव संकल्पना घेऊन व्यवसायात उतरा.उद्योगाला लायक होण्यासाठी स्वतःला बदलले पाहिजे. सतत नवनवीन गोष्टी शिकून घेता आल्या पाहिजेत. लोकांना समजून घेणे, प्रभावित करणे आणि त्यांच्याकडून काम करून घेता येणे व्यवसायात महत्वाचे असते. विद्यार्थी दशेपासून उद्योगाच्या, उद्योजकतेच्या संपर्कात राहिले पाहिजे.’

याप्रसंगी बोलताना डॉ. पीए इनामदार म्हणाले, ‘नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय उभारण्याची जिद्द ठेवली पाहिजे. विद्यार्थी दशेपासून उद्योजकतेची कास ठेवली पाहिजे. व्यवसाय निवडताना त्यातील सर्व बारकावे माहित असणे गरजेचे आहे. एसएम कुंभार यांनी मुख्यमंत्री उद्योजकता विकास योजनेची माहिती दिली. कीर्ती सप्रे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.