BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : सत्ताधा-यांना पडला ‘पिंपरी-चिंचवड फेस्टिवल’चा विसर!

दुस-यावर्षीच 'पिंपरी-चिंचवड फेस्टिवल' केला खंडित  

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला गणेशोत्सवानिमित्त गतवर्षी सुरु केलेल्या ‘पिंपरी-चिंचवड फेस्टिवल’चा दुस-याच वर्षी विसर पडला आहे. सत्ताधारी भाजपने गतवर्षी 14 वर्षानंतर गणेश फेस्टिवल पुनर्जीवीत करत सुरु केला होता. हा फेस्टिवल कायम सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सांगतिले होते. मात्र; यंदा सत्ताधा-यांना त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे शहरवासियांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हा फेस्टिवल सुरु करणारे तत्कालीन महापौर नितीन काळजे यांनी देखील फेस्टिवल कायम चालू ठेवणे अपेक्षित होते असे सांगत नाराजी व्यक्त केली. 

आर.एस.कुमार महापौर असताना 1996 साली पालिकेने पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिवल सुरु केला होता. या अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत होते. चार दिवस हा फेस्टीवल चालत होता. हा महोत्सव पिंपरी, निगडी, भोसरी अशा विविध ठिकाणी करण्यात आला. भारतरत्न भीमसेन जोशी, उदित नारायण, सोनू निगम, अण्णु मालक, साधना सरगम अशा विविध मान्यवर कलावंतांचा कलाविष्कार शहरवासियांना अनुभवयास मिळाला.  दरम्यान, गणेश फेस्टीवलच्या आयोजनावरुन  चढाओढ सुरु झाली. त्यामुळे प्रकाश रेवाळे यांनी महापौर असताना 2003 साली गणेश फेस्टिवल बंद केला होता. त्यानंतर 14 वर्ष गणेश फेस्टिवल बंद होता.

गतवर्षी पालिकेत भाजपची सत्ता आली. त्यानंतर गणेश फेस्टिवल पुन्हा सुरु करण्याचा निर्णय सत्ताधा-यांनी घेतला. त्यामध्ये तत्कालीन महापौर नितीन काळजे यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार  पिंपरी-चिंचवड फेस्टिवल सुरु केला होता. तीन दिवसीय फेस्टिवलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते. हा फेस्टिवल यापुढे कायम ठेवण्यात येणार असल्याचे सत्ताधा-यांनी सांगतिले होते. यंदा; मात्र सत्ताधा-यांना त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे शहरवासियांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

माजी महापौर नितीन काळजे म्हणाले, ‘पुण्यात ‘पुणे फेस्टिवल’ घेतला जातो. पिंपरी-चिंचवड शहर देखील मोठे असून शहरात नाट्यगृहे आहेत. शहरात सांस्कृतिक कल्चर वाढावे. स्थानिक कलाकांराना व्यासपीठ उपलब्ध व्हावे. त्यांच्या कलागुणांवा वाव मिळावा. यासाठी गतवर्षी गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी-चिंचवड फेस्टिवल’ घेण्यात आला होता. ही परंपरा कायम ठेवणे अपेक्षित होते. त्यात खंड पाडणे चुकीचे आहे. सांस्कृतिक कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. त्यासाठी निधीची तरतूद करणे देखील अतिशय आवश्यक आहे. यंदा फेस्टिवल खंडित केल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली’.

तर, प्रशासनाकडून माहिती घेऊन सांगतो, असे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A4

.