Lonavala: संचारबंदीतही वादग्रस्त वाधवान कुटुंबाला खंडाळा ते महाबळेश्वर प्रवासासाठी शासकीय ‘रेड कार्पेट’!

एमपीसी न्यूज – कोरोना जागतिक महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला असतानाच दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमधील (डीएचएफएल) कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या वाधवान कुटुंबाला हवापालटासाठी खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करण्यासाठी राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘रेड कार्पेट’ घालून दिल्याची धक्कादायक पुढे आल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. वाधवान कुटुंबातीन नऊ सदस्यांसह एकूण 23 जणांना कंपनीच्या महाबळेश्वर येथील बंगल्यातून ताब्यात घेण्यात आले असून पाचगणी येथील एका इमारतीत 14 दिवेसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. या प्रकरणामुळे विरोधकांनी देखील राज्यातील उद्धव ठाकरे सरकारवर ‘हल्ला बोल’ केला आहे. 

राज्यात संचारबंदी असताना वाधवान कुटुंबातील नऊ सदस्य व कर्मचारी असे मिळून एकूण 23 जण बुधवारी रात्री सात मोटारींमधून खंडाळा येथून महाबळेश्वरला येऊन धडकले. त्यांच्याकडे गृह मंत्रालयातील विशेष सचिवांचे पत्र असल्याने त्यांना प्रवासात कुणीच अडवले नसल्याची माहिती पुढे आली आहे. महबळेश्वर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तपासणीत हे कुटुंब एका बंगल्यात सापडले. त्यांना तिथून पाचगणीतील एका इमारतीत क्वारंटाईन करण्यात आले आहे. सर्वांवर 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वाधवान कुटुंबासह एकूण 23 जणांना खंडाळा ते महाबळेश्वर जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

कपिल वाधवान, अरुणा वाधवान, वनिता वाधवान, टीना वाधवान, धीरज वाधवान, कार्तिक वाधवान, पूजा वाधवान, युविका वाधवान, अहान वाधवान यांच्यासह शत्रुघ्न घागा, मनोज यादव, विनोद शुक्ला, अशोक वाफेळकर, दिवाण सिंग, अमोल मंडल, अमोल मंडल, लोहित फर्नांडिस, जसप्रीत सिंह, अरी, जस्टीन डिमेलो, इंद्रकांत चौधरी, प्रदीप कांबळे, एलिझाबेथ अय्यापिल्लई, रमेश शर्मा, तारकर सरकार अशी या 23 जणांची नावे आहेत.

देश लॉकडाऊन असताना मुंबईतून महाबळेश्वरात दाखल झालेल्या वाधवान कुटुंबामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. राज्यात संचारबंदी असताना या कुटुंबाला कोणी परवानगी दिली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र असल्याने त्यांना रस्त्यात कोणीच अडवले नाही. या पत्रावर सर्व वाहनांचे क्रमांक आणि सदस्याची माहिती आहे. या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. सात गाड्यांमधून हे 23 जण मुंबईतून महाबळेश्वरमध्ये एका बंगल्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी माहिती मिळाली आणि त्यांनी तातडीने ही माहिती तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांना दिली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.

डीएचएफएल दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या बंगल्यावर हे सर्वजण वास्तव्यास होते. 23 मध्ये वाधवान कुटुंबातील नऊ सदस्य व सेवेतील अन्य नोकरचाकर मिळून २३ जणांचा समावेश आहे. महाबळेश्वरातील गणेशनगर सोसायटीशेजारी हा बंगला आहे. आम्हाला बंगल्यातच होम क्वॉरंटाईन करावे असा वाधवान कुटुंबाचा आग्रह होता. वाधवान कुटुंबाचे अतिवरिष्ठ पातळीवर संबंध असल्याने गुन्हा दाखल करताना प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड दबाव असल्याचे दिसून येत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.