Chakan News : प्रेम विवाह केल्याने मुलाच्या नातेवाईकांना मुलीच्या नातेवाईकांकडून मारहाण

एमपीसी न्यूज – एका तरुणाने आपल्या मुलीसोबत पळून जाऊन प्रेम विवाह केल्याने त्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री नऊ वाजता खेड तालुक्यातील खालुंब्रे येथे घडली.

सुभाष लक्ष्मण धामणकर (वय 53, रा. उर्से, ता. मावळ) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 10) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खंडू बापू पवार (वय 48), पंडित बापू पवार (वय 46), आशुतोष खंडू पवार (वय 20, तिघे रा. खालुंब्रे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाने आरोपी खंडू पवार यांच्या मुलीसोबत पळून जाऊन कोर्ट मॅरेज केले आहे. झालेल्या गोष्टींचा राग न धरता दोन्हीकडच्या मंडळींनी शुक्रवारी रात्री एक बैठक घेतली. बैठकीत बाचाबाची झाल्याने आरोपींनी फिर्यादी यांचे मेहुणे व चुलत भाऊ यांना लथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात फिर्यादी खाली पडले. त्यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला. फिर्यादी यांच्या मेहुण्याला मारहाण करून जखमी केले. तसेच ‘तुम्हाला सोडणार नाही’ अशी आरोपींनी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.