Interview with CP Krishna Prakash : कठीण परिस्थितीत चांगले काम करण्याची आवड : कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज – एखाद्या अधिका-याच्या अंगी संवेदनशीलता आणि सामाजिक भान असेल तर अनेक स्थानिक समस्यांचा चुटकीसरशी निपटारा होतो. प्रेरणादायी भाषण कौशल्य असेल तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये दुर्गुणांविरोधात लढण्याचे साहस निर्माण होते. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश देखील अशाच प्रकारचे कार्यकुशल व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी नुकतीच ‘जनभावना’ या दिल्लीतून प्रकाशित होणाऱ्या मासिकासाठी ज्येष्ठ पत्रकार कुमारी रंजना यांना मुलाखत दिली. त्या मुलाखतीचा मराठी भाषेत सारांश –

प्रश्न : आपण 1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी, मोटिवेशनल स्पीकर, आयर्नमॅन, लेखक, कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी आहात, आपल्यातील सशक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश कोण आहेत?
उत्तर : माझ्यातील आयुक्त कृष्ण प्रकाश हा एका अर्थाने खरा आत्मा आहे. हा आत्मा चांगला माणूस बनण्याचा प्रवास करत आहे. एक रिलेटिव्ह टर्म आहे. त्यात एखादी व्यक्ती चांगली असू शकते, खूप चांगली असू शकते अथवा सर्वात चांगली असू शकते. पण मी एब्सलूत टर्म जीवनात अंगीकारत आहे. त्यामध्ये खरी व्यक्ती ती आहे, जी प्रत्येकासाठी चांगली असावी आणि वाईटही असावी. चुकीच्या गोष्टींना खोडून काढत चांगल्याचे समर्थन करण्याचा माझा प्रयत्न सुरु आहे.

प्रश्न : आयर्नमॅन बाबत काय सांगाल?
उत्तर : स्वामी विवेकानंद यांनी म्हटलं आहे – Our country man should have nerves of steel, muscles of iron and minds of thunder bolt if we want to create inspirational history, we need to have an iron man. त्यांच्या या विचाराला मी अंगिकारण्याचा प्रयत्न करीत आहे. माझं मन कायम लोहाप्रमाणे कठीण आणि कणखर राहिलं आहे. जेवढा दबाव असतो, तेवढा काम करण्याचा आनंद मिळतो. माझ्या भावना मी या शब्दात सांगेन की – तुममे हिरे की शिकत है तो अँधेरे में मिलो, धुप में कांच के टुकड़े भी चमक जाते है.

आयर्नमॅन ही एक रेस आहे. वर्ल्ड ट्रिलिथॉन असोसिएशन या संस्थेकडून जगाच्या विविध भागात हिचे आयोजन केले जाते. मी पहिला भारतीय सरकारी अधिकारी आहे, ज्याने या स्पर्धेत भाग घेतला. फ्रांसमध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती. 17 तासात स्पर्धा पूर्ण करायची होती, मी ही स्पर्धा 14 तासात पूर्ण केली आणि मला ‘आयर्नमॅन’ ही उपाधी मिळाली.

प्रश्न : रेस अक्रॉस द वेस्ट (रॉ) पूर्ण करणारे तुम्ही पहिले भारतीय आहात, त्याबाबत काय सांगाल?
उत्तर : कॅलिफोर्निया मध्ये सोनोरा आणि मोजाबे हे दोन वाळवंटी प्रदेश आहेत. या प्रदेशातील तापमान अनुक्रमे 47 आणि 52 अंश असते. हा परिसर एक हजार 500 किलोमीटरच्या क्षेत्रात पसरला आहे. सायकलवरून हा परिसर पूर्ण करण्यासाठी 92 तासांचा वेळ असतो, मी हा परिसर केवळ 88 तासांमध्ये पूर्ण केला आणि जगात चौथा क्रमांक पटकावला.

प्रश्न : आपण एका ठिकाणी बोलताना म्हटले आहे की – मुझे बदल दो, या फिर कानून बदल दो’. तर दोन दशकांच्या आपल्या सेवेच्या काळात काय बदल झाला?
उत्तर : महाराष्ट्र असो किंवा इतर कुठेही बदल हा निसर्गाचा नियम आहे. महात्मा गांधीजींनी म्हटलं आहे – ‘देयर इज नथिंग परमनंट एक्सेप्ट द चेंज’. बदल हा स्थायीभाव आहे, जो सातत्याने होत राहतो. हा बदल तीन प्रकारचा असतो – संघटनात्मक, संस्थात्मक आणि वैचारिक. आतापर्यंत मी जिथे जिथे काम केले आहे, तिथे जनता आणि पोलीस यांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. मालेगाव मध्ये असताना कॉइन गेमचे रॅकेट पूर्णतः उध्वस्त केले. मालेगाव, नांदेड, बुलढाणा इथे दंगली होत होत्या. पण माझ्या प्रयत्नांमुळे मागील 20  वर्षांपासून तिथे कोणतीही दंगल झाली नाही. जातीय संघर्ष रोखण्यात मी यशस्वी झालो. हाच तर संघटनात्मक आणि संस्थात्मक बदल आहे. मला जिथे काम करण्याची संधी मिळाली, तिथे मी चांगला बदल करण्याचा प्रयत्न केला. व्यक्ती मोठी नसते, तर संस्था मोठी असते.

प्रश्न : ‘हम निःशब्द रहकर भी संवाद रचते है, हौसलों के दम पर नया परवाज रचते है’ या ओळींना नागरिकांनी कसे अंगी कारावे?
उत्तर : याला असे समजा – प्रत्येक व्यक्ती विशिष्ट आहे. त्यात काही ना काही विशिष्ट गुण असतोच. व्यक्तीने आपल्यातील विशिष्ट गुणांना ओळखायला हवं. ज्या क्षेत्रात त्याला आवड आहे, त्यात तो यश मिळवू शकतो. जर तो इतरांचे अनुकरण करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेल तर त्याला काहीच मिळणार नाही. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. आपले काम आपली आवड बनते त्यावेळी एक चमत्कार होतो. इथे मला भगवत गीतेतील एक श्लोक आठवतो – ‘योगः कर्मेषु कौशलम’ म्हणजे आपल्या कामात कुशलता प्राप्त करा.

प्रश्न : सुरक्षेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांच्या समस्या काय आहेत?
उत्तर : सुरक्षेच्या दृष्टीने शहरात दोन, तीन प्रकारच्या समस्या आहेत. पहिली समस्या अशी की, इथल्या अनेक आस्थापना आर्मीशी संबंधित आहेत. या नागरिकांशी जोडलेल्या नाहीत, त्यांची स्वतंत्र व्यवस्था आहे, पण त्यांची सुरक्षा महत्वाची आहे. दुसरे आहे माहिती तंत्रज्ञान कंपन्या. तिसरे आहे औद्योगिक आस्थापना. इथे खंडणी, औद्योगिक पट्ट्यातील जमीन हडपणे, त्यावर कब्जा करणे, धमकावून कमी किमतीत जमीन खरेदी करणे अशा देखील काही समस्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना कमी होत जाते. स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे.

प्रश्न : कामगारांच्या संबंधित समस्या शहरातील क्राईम रेट वाढवतात?
उत्तर : पिंपरी-चिंचवड शहरात अनेक कामगार इतर ठिकाणाहून येऊन वास्तव्य करत आहेत. ते इथे काम करतात पण त्यांचे आपल्या मुलांकडे लक्ष नाही. त्यामुळे कामगारांच्या मुलांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण वाढते. चोरी, अंमली पदार्थ, हत्यारे यात ही मुले ओढली जातात.

प्रश्न : धार्मिक सुरक्षा सुद्धा एक मुद्दा आहे?
उत्तर : पिंपरी-चिंचवड शहरात  हिंदू,बौद्ध आणि अन्य अन्य धर्माचे लोक आहेत. या धर्माचे अनुयायी शहरात वास्तव्यास आहेत. त्यांची सुरक्षा देखील आमच्यासाठी महत्वाची आहे.

प्रश्न : घरगुती हिंसाचाराची शिकार होणा-या महिलांसाठी आयुक्तालयात काय उपाययोजना आहे?
उत्तर : घरगुती हिंसाचाराच्या शिकार होणा-या महिलांसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘भरोसा सेल’ आहे. याला आपण वन स्टेप सेंटर देखील म्हणू शकतो. यामध्ये बाल आणि महिला सुरक्षेसाठी समुपदेशक, डॉक्टर आणि अन्य सुविधा असणं आवश्यक आहे. ते उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने भरोसा सेल सक्रियपणे काम करत आहे.

प्रश्न : शहरात सिग्नलवर अनेक लहान मुले भीक मागताना दिसतात, त्याबाबत आपली काही योजना आहे का?
उत्तर : या प्रकरणात वेगळ्या प्रकारची कारवाई आवश्यक आहे. मुलांना भीक मागण्यासाठी त्यांचे पालकच प्रवृत्त करतात. ते मुलांच्या भीक मागण्याला त्यांचा उत्पन्नाचा मार्ग समजतात. अशा पालकांच्या मनपरिवर्तनातून या मुलांचे विस्थापन करण्यासाठी योजना तयार केली जात आहे. शिक्षण घेणे हा मुलांचा पहिला अधिकार आहे.

प्रश्न : पोलीस विभागाशी पीडित नागरिकांनी कसा संपर्क करावा? ज्यामुळे तात्काळ कारवाई होऊ शकेल?
उत्तर : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वेबसाईटवर सर्व अधिका-यांचे संपर्क उपलब्ध आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांप्रमाणे सध्या आमच्याकडे अलोटेड नंबर नाहीत. नागरिकांनी प्रथम पोलीस निरीक्षक यांच्याकडे आपली समस्या मांडावी. तिथे समाधान न झाल्यास सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, अपर पोलीस आयुक्त यांच्याकडे समस्या मांडावी. तिथेही समाधान न झाल्यास पोलीस आयुक्तांकडे यावे. मी पाहतो, अगदी लहान लहान समस्यांसाठी देखील नागरिक मला फोन करतात. पण नागरिकांनी योग्य प्रकारे आणि योग्य टप्प्यावर त्यांची तक्रार मांडायला हवी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.