Pune News : कमी पटसंख्या असलेल्या शाळा सुरूच राहणार-शिक्षण आयुक्त

एमपीसी न्यूज : राज्यात कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार का? यावर गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती. शिक्षण आयुक्तांनी मात्र या प्रकरणी दिलासा दिला आहे. (Pune News) एकाच गावात अतिशय कमी पट असणाऱ्या दोन सरकारी शाळा असतील तर अशा शाळांचे समायोजन करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच दुर्गम भागात, डोंगर खोऱ्यात एखाद्या शाळेत पटसंख्या कमी असली, तरीही तिला अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने अशा शाळा सुरूच ठेवाव्या लागणार आहेत, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे, शिक्षकांचे समायोजन, शिक्षक भरती अशा शिक्षण विभागातील विविध विषयांवर मांढरे यांनी संवाद साधला. ते म्हणाले,‘‘राज्यात कमी पटसंख्येच्या साधारणतः: चार हजार आठशे शाळा आहेत. परंतु या शाळा अचानकपणे बंद करणे शक्य होणार नाही. राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील मुलांना शिकण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्या शाळा बंद करून चालणार नाही. तसेच अनेक ठिकाणी डोंगराळ भागात शाळा आहे.

Pune News : पुण्यात गारठा वाढला, पुणेकरांसाठी डिसेंबर महिना थंडीचा

या शाळा वस्ती, गावे यांच्या जवळ असून या शाळा बंद केल्यास तेथील मुलांना जंगलातून अन्य शाळेत जावे लागण्याची शक्यता आहे. परिणामी त्यांच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा दुर्गम, आदिवासी आणि डोंगराळ भागातील शाळाही बंद करता येणार नाहीत. (Pune News) परंतु, एकाच गावात कमी अंतरामध्ये दोन शाळा असतील आणि त्यात विद्यार्थी संख्याही कमी असेल, तर अशा शाळांचे निश्चितच समायोजन करण्यात येईल.’’

‘शाळांचे समायोजन म्हटलं की शिक्षक अतिरिक्त होणार, असे बोलले जाते. परंतु यात फारसे तथ्य नाही. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत,’’ असेही मांढरे यांनी सांगितले. (Pune News) शालेय शिक्षण विभागात सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शिक्षण विभागातील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण होऊ शकणार आहेत. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना अनावश्यक त्रास दिला जात असल्यास, त्याची तक्रार आता शिक्षण विभागाकडे करता येणार आहे. त्यासाठी ‘ग्रिव्हन्स पोर्टल’ची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत, ते खुले केले जाईल, असेही मांढरे यांनी नमूद केले.

शिक्षण विभागाच्या कामकाजासाठी नवे पोर्टल

शिक्षण विभागातील दैनंदिन कामे जलदगतीने व्हावीत, यासाठी सरल प्रणालीप्रमाणे नवे पोर्टल तयार करण्यात येत आहे. त्याचा वापर अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांना दैनंदिन कामाची माहिती तातडीने शिक्षण विभागाकडे पाठविणे शक्य होणार आहे. हे पोर्टल नव्या वर्षाच्या सुरवातीला, म्हणजेच जानेवारीमध्ये सुरू करण्याचा मानस असल्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.