LPG Price Hike : घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती भडकल्या; अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपये 50 पैशांची वाढ

एमपीसी न्यूज – महिन्याच्या सुरुवातीलाच जर तुम्ही आगामी महिन्याचे बजेट बनवत असाल तर जरा थांबा. ही बातमी वाचा आणि मग घरचे बजेट बनवा. कारण घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती भडकल्या असून अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे.

सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये देखील सिलेंडरचे दर वाढले होते. तर एप्रिल महिन्यात सिलेंडरचे दर 10 रुपयांनी कमी करण्यात आले होते. मागील महिन्यात (1 मे) एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात सरकारी तेल कंपन्यांनी कोणताही बदल केला नव्हता.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. खाद्य तेलाच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातच आता सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या किंमतीही वाढवल्या आहेत. 14 किलोच्या अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

मुंबई आणि दिल्लीमध्ये आज 14.2 किलोचा सिलेंडर 834 रुपये 50 पैशांना मिळणार आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरचा दर 861रुपये झाला आहे. चेन्नईत 850.50 रुपये, अहमदाबाद मध्ये 841.50 रुपयांना घरगुती अनुदानित सिलेंडर मिळणार आहे. चालू वर्षात आतापर्यंत एलपीजी सिलेंडरच्या दरात 140 रुपयांची वाढ झाली आहे.

गृहिणी वैष्णवी गुळमे म्हणाल्या, “आधीच कित्येक गोष्टी महागल्या आहेत. महागाईमुळे महिन्याचे बजेट पार कोलमडून जाते. प्रत्येक महिन्यात ही भाववाढ सुरू आहे. कोरोना काळात अनेकांची कामे बंद झाली आहेत. सध्या अनेकांना रोजगार बंद झाल्याने जगण्याची भ्रांत निर्माण झाली आहे. त्यात महागाई पिच्छा सोडत नाही. सर्वसामान्यांनी जगायचे कसे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.