Pune : पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 15 डिसेंबरला 2200 घरांसाठी ‘लकी ड्रॉ’

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील पंतप्रधान आवास योजनेसाठी येत्या 15 डिसेंबर 2019 ला ‘लकी ड्रॉ’ काढण्यात येणार आहे. खराडी, हडपसर आणि वडगाव या भागात 2200 घरांसाठी हा ‘लकी ड्रॉ’ काढण्यात येणार आहे. 5 हजार नागरिकांनी आपल्याला घर मिळावे म्हणून पुणे महापालिकेकडे अर्ज केले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज दिली.

देशातील प्रत्येक नागरिकाला 2022 पर्यंत घर देण्याचे आश्वासन भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात दिले आहे. या योजनेचे पुणे शहरात अतिशय संथगतीने काम सुरू होते. आता मात्र या योजनेला वेग आला आहे. साधारण 9 लाख रुपये किमतीत सामान्य माणसाला घर मिळणार असल्याचे सांगण्यात येते.

पुणे शहरात आज जागांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. शहर आणि उपनगरात सामान्य माणसाला राहणे परवडत नाही. त्यामुळे हे नागरिक महापालिका हद्दीलगतच्या ग्रामपंचायतीच्या परिसरात राहतात. हे अंतर 15 ते 20 कि. मी. आहे. भाड्याच्या घरात राहण्यासाठी 5 ते 8 हजार रुपये मोजावे लागते. पुणे शहरात 1 bhk साठी 40 लाख तर, उपनगरात 30 ते 35 लाख 1 bhk साठी मोजावे लागतात.

‘हातावरचे पोट’ असणाऱ्या नागरिकांना ही रक्कम जमा करणे स्वप्नवतच आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजना महत्वाची असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काही नागरिकांना भाड्याने राहणेही परवडत नसल्याने ते मग अतिक्रमण करून, झोपडपट्टीत किंवा ओढे – नदीच्या कडेने वास्तव्य करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like